बेळगाव लाईव्ह : पावसाळा तोंडावर आलेला असताना शहरातील गटारी, नाले आणि रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेता बेळगाव महापालिकेत सोमवारी विशेष बैठक घेण्यात आली. महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून गाळ काढण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.
बैठकीत अनेक नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडताना प्रशासनाच्या हलगर्जीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजीनगर आणि वीरभद्रनगर भागात गटारीचे पाणी घरात शिरत असल्याची तक्रार नगरसेविका रेश्मा भैरकदार यांनी केली. निधी असूनही कामे का होत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नगरसेवक रियाझ किल्लेदार यांनी १५० घरे गटारीच्या पाण्यामुळे त्रस्त असल्याचे सांगत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली. वीणा विजापूरे यांनी गणेशनगरमधील कामासाठी निविदा झाली असूनही अद्याप काम सुरू न झाल्याचा मुद्दा मांडला.
मिलेनियम गार्डन व आरपीडी कॉर्नर भागातील गटारींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नितीन जाधव यांनी केली. अरुंद गल्ल्यांमधील गटारी स्वच्छ करण्यासाठी नवीन यंत्रणा खरेदीची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगरसेवक मुश्ताक मुल्ला यांनी त्यांच्या प्रभागातील आश्रय कॉलनीत शौचालयांची अनुपलब्धता, नाल्यांची दुरवस्था याविषयी भाष्य केले. त्यांना विरोधी पक्षनेते मुजम्मिल ढोणी यांनी पाठिंबा दिला. गिरीश धोंगडी यांनी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, अधिकारी वेळेवर भेटत नाहीत, प्रतिसाद देत नाहीत, अशी तक्रार केली.

तर शाहीद पठाण यांनी परवानगीशिवाय सुरू असलेल्या सीएनजी पंपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, प्रशासनाने स्वतःहून कारवाई करावी, अशी मागणी केली. स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असून फुटपाथवर खड्डे पडले आहेत, असे दिनेश नाशीपुडी यांनी सांगितले. यावर त्यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या विशेष बैठकीची मागणीही केली. फक्त बैठका घेऊन उपयोग नाही, महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनी प्रभागांना भेटी देऊन समस्यांचे प्रत्यक्ष निराकरण करावे, असा स्पष्ट सूर रमेश सोंटक्की यांनी मांडला.
बैठकीत सर्व नगरसेवकांनी पावसाळ्यापूर्वी प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी तातडीने आणि ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली. महापौर मंगेश पवार यांनी सर्व मागण्या आणि तक्रारी गांभीर्याने घेत ठोस कृतीचे आश्वासन दिले. या बैठकीस उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाळी, विरोधी पक्षनेते मुजम्मिल ढोणी, आयुक्त शुभा बी. यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.