बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यासाठी बहुप्रतीक्षित असलेले शासकीय कर्करोग रुग्णालय आता चिक्कोडीऐवजी बेळगाव शहरातच साकारले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज जिल्हा विकास परिषदेच्या (केडीपी) बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या जागेबाबत विस्तृत चर्चा झाली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून रुग्णालयासाठी योग्य आणि सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण जागा शोधण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी मागण्यात आला आहे.
बैठकीच्या सुरुवातीला, दिव्यांग कल्याण विभागामार्फत मंजूर असलेल्या व्हीलचेअरच्या वितरणात होत असलेल्या विलंबाचा मुद्दा विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी उपस्थित केला. यावर संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली. त्यानंतर शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन स्थलांतरित करण्याच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत विचारले असता, जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) अशोक शेट्टी यांनी हे मशीन यापूर्वीच रुग्णालयात कार्यान्वित असल्याची माहिती दिली, ज्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा विषय ठरला तो बेळगाव जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या कर्करोग रुग्णालयाच्या जागेचा. विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीबाबत आणि जागेच्या निश्चितीबाबत प्रशासनाला प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात योग्य आणि मोठ्या जागेची उपलब्धता तसेच रुग्णांना सोयीस्कर ठरू शकेल अशा ठिकाणाचा शोध घेण्यासाठी दहा दिवसांचा वेळ मागितला. यामुळे आता चिक्कोडीऐवजी बेळगावातच हे रुग्णालय उभे राहण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
या महत्त्वपूर्ण विषयांव्यतिरिक्त, बैठकीत जिल्ह्यातील कृषी विभाग, फलोत्पादन विभाग, पशुसंवर्धन विभाग, वन विभाग, रेशीम उद्योग, मत्स्यव्यवसाय आणि आरोग्य विभाग यांच्यासह विविध शासकीय विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. विकास योजनांची प्रगती आणि नागरिकांच्या समस्यांवर यावेळी चर्चा झाली.

या केडीपी बैठकीला आमदार आसिफ सेठ, दुर्योधन ऐहोळे, गणेश हुक्केरी, विश्वास वैद्य यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यासोबतच जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे आणि इतर वरिष्ठ शासकीय अधिकारीही बैठकीत सहभागी झाले होते. आता जिल्हाधिकारी दहा दिवसांत कर्करोग रुग्णालयासाठी कोणत्या जागेची निवड करतात, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. बेळगावातच हे रुग्णालय झाल्यास जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत मोठी भर पडणार आहे.