बेळगाव लाईव्ह :पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या घटनेनंतर भारतात वास्तव्य असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ माघारी पाकिस्तानला धाडण्यात यावे या केंद्र सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी कर्नाटकातील काँग्रेस सरकार करत नसल्याच्या निषेधार्थ, तसेच त्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केली जावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव महानगर आणि जिल्हा शाखेतर्फे आज मंगळवारी सकाळी शहरात आंदोलन छेडण्यात आले.
कर्नाटकातील पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ पाकिस्तानात पाठवा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव महानगर आणि जिल्हा शाखेतर्फे आज मंगळवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा चौकामध्ये आंदोलन छेडण्यात आले. यावेळी चौकात ठिय्या मारून धरणे सत्याग्रह करत राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकारून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. भाजपच्या या आंदोलना शहर आणि जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
आंदोलनाप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, पहेलगाम येथील अतिरेकी झाल्यानंतर पाकिस्तानवर कठोर कारवाई व्हावी अशी देशातील समस्त जनतेची मागणी आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना आदेश दिला आहे की जे कोणी पाकिस्तानी राज्यात वास्तव्य करून आहेत त्यांना माघारी पाकिस्तानला पाठवून द्या. या आदेशाची देशभरात अंमलबजावणी होत असताना कर्नाटक सरकार मात्र निवांत बसले आहे. त्या आदेशांमध्ये देखील त्यांना राजकारण दिसू लागले आहे. हे आंदोलन देखील भारतीय जनता पक्षाचे नसून भारतातील प्रत्येक नागरिकाचे आहे, जो भारतावर प्रेम करतो, जो भारताची संस्कृती परंपरा अबाधित राखण्याची इच्छा बाळगतो, ज्याला देश प्रमुख आहे अशा प्रत्येकाचे हे आंदोलन आहे.

राज्यातील काँग्रेस सरकार मात्र दुष्टीकरणाचे राजकारण करत मुस्लिम बांधवांना वाईट वाटेल म्हणून काहीही न करता गप्प बसून राहिले आहे. आम्ही कधीही मुसलमानांना राज्यातून बाहेर काढा म्हंटले नाही, तर पाकिस्तानी नागरिकांना हाकलून लावा असे म्हंटले आहे. आमच्या मागणीचा साधा अर्थ कळण्याचे भान जर मुख्यमंत्र्यांना नसेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. जर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातीलच एखादी व्यक्ती आतंकवादी हल्ल्यात बळी गेली असती तर? याचा त्यांनी विचार करावा. आपल्या देशाबद्दल आपल्या सैनिकांबद्दल विचार करण्याची जबाबदारी आम्हा प्रत्येक नागरिकांची आहे. त्यानुसार राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना माघारी त्यांच्या देशात पाठवण्याची जबाबदारी ही कर्नाटक सरकारची आहे आणि ती त्यांनी त्वरित पार पाडावी. त्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत जर आमच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही झाली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी आमदार संजय पाटील यांनी दिला.
भाजप नेते गुरुघेंद्रगौडा पाटील आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यांना त्यांच्या व्याप्तीत वास्तव्य करून असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ त्यांच्या देशात माघारी धाडावे असा आदेश दिला आहे. तथापि या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी राज्यातील काँग्रेस सरकार चालढकल करून मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्यात व्यस्त आहे.
राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात आज आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे आवाज उठवला आहे. राज्यातील बऱ्याच मुस्लिम युवतींचे विवाह पाकिस्तानातील युवकांशी झाले आहेत. मात्र त्या पाकिस्तानात सासरी नवऱ्यासोबत नांदण्याऐवजी येथेच वास्तव्य करून भारतातील सोयी सुविधांचा लाभ घेत आहेत. अशा लोकांना तडकाफडकी पाकिस्तानला धाडण्याऐवजी काँग्रेस सरकार चालढकल करत आहे. याच्या निषेधार्थ आम्ही रस्त्यावर उतरलो असून जर राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना त्वरेने त्यांच्या देशात घडले नाही तर आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन हाती घेऊ, असे गुरुघेंद्रगौडा पाटील यांनी स्पष्ट केले.



