बेळगाव लाईव्ह :ड्युटीवर असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका महिला रुग्णाला आपले प्राण गमवावे लागल्याची संतापजनक घटना बिम्स हॉस्पिटलमध्ये घडल्याचे कळते.
निधन पावलेल्या दुर्दैवी रुग्ण महिलेचे नांव प्रभावती विशू मिरजकर असे असून त्या शहरातील संपगी रोड, विश्वेश्वरय्यानगर येथील रहिवासी होत्या. बिम्स एमआयसीयू वॉर्ड मधील ड्युटीवर असलेल्या डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे गेल्या सोमवारी 19 मे रोजी त्यांना आपला जीव गमवावा लागल्याचे समजते.
यासंदर्भात एका सामाजिक कार्यकर्त्याने काल मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास बिम्सच्या संबंधित वार्ड मध्ये जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याद्वारे शहानिशा केली असता त्या ठिकाणी रुग्णसेवेसाठी खरोखर एकही डॉक्टर किंवा नर्सिंग स्टाफ उपस्थित नव्हता.

वार्डमधील सर्व रुग्णांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. बिम्स हॉस्पिटल प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव शहर परिसरातील रुग्णांचे उपचार करणाऱ्या बिम्स मधली परिस्थिती सुधारणार तरी कधी? बाजूला असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उद्घाटन झाल्यानंतर तरी रुग्णांना न्याय मिळेल का? BIMS मधील या परिस्थितीला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत.


