belgaum

प.पू. श्री मंजूनाथ स्वामीजींच्या सान्निध्यात भक्तीमय संध्या

0
39
 belgaum

बेळगाव लाईव्ह:वडगाव, बेळगाव येथील पटवर्धन ले-आऊट उद्यानामध्ये मराठा समाजाचे आधारस्तंभ प.पू. मराठा जगदगुरू वेदांताचार्य श्री श्री श्री मंजूनाथ भारती महास्वामीजी यांच्या पावन सानिध्यात आयोजित अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भक्तीमय कार्यक्रम काल बुधवारी सायंकाळी अत्यंत उत्साहात पार पडला.

सदर विशेष कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविकानंतर स्वामीजींसह मराठा जागृती निर्माण संघाचे प्रमुख गोपाळराव बिर्जे, वर्षा बिर्जे, आप्पासाहेब गुरव आणि शंकर पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

सदर कार्यक्रमांतर्गत सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत बेळगावातील 15 महिला भजनी मंडळांनी सामूहिक भजन सादर करून वातावरण भक्तीमय केलं. ‘भक्तीमध्येच शक्ती आहे’ हा संदेश त्यांच्या भजनातून स्पष्टपणे उमटत होता. त्यानंतर 5 ते 6 या वेळेत स्वामीजींचं “अध्यात्मिक व सामाजिक चिंतन” या विषयावर प्रेरणादायी प्रवचन झालं. त्यांनी समाज प्रबोधन, स्त्री शक्ती, संस्कार, मराठा समाजाचं योगदान आणि नवयुवकांच्या भूमिका यावर मार्गदर्शन केलं.

 belgaum

श्रोत्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या त्यांच्या वक्तृत्वातून अनेकांना नवी दिशा मिळाली. प्रवचनानंतर सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत स्वामीजींचे रागाधारित शास्त्रीय भजन गायन झाले. त्यांच्या “मन लागो रे भजन करीलें रे, लहान पण दे गा देवा” यासारख्या भजनांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. या संगीत सत्राला हार्मोनियमवर चंद्रज्योती देसाई आणि तबल्यावर आकाश सौदागर यांनी सुरेख साथ दिली. देसाई यांची साथ विशेष गोडीची आणि भावस्पर्शी ठरली.

सदर कार्यक्रमाच्या स्वरूपात बेळगावच्या शेकडो नागरिकांनी एक भक्तिपूर्ण संध्याकाळ अनुभवली. तसेच मराठा समाजाची एकता, श्रद्धा आणि संस्कृतीचे दर्शन घडवले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठा जागृती निर्माण संघाचे प्रमुख गोपाळराव बिर्जे यांचे विशेष योगदान होते.

सूत्रसंचालन सीमाकवी रविंद्र पाटील यांनी केले, तर वर्षा तोपिनकट्टी हीने आभार मानले. हा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि संस्कृतीचा जणू उत्सव ठरला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.