बेळगाव लाईव्ह : बेळगावातील रिक्षांसाठी येत्या तीन महिन्यांत शहरातील सर्व रिक्षांना मीटर बंधनकारक केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली आहे. यामुळे प्रवाशांना वाजवी दरात रिक्षा प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, ऑटो मीटर सक्तीचे करण्यासाठी प्रादेशिक परिवहन आयुक्तांसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. तसेच, ऑटो चालक संघटनांशीही यावर सविस्तर चर्चा झाली आहे.
बेळगाव शहरात सध्या एकूण १५,००० रिक्षांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता रिक्षांची वाढती संख्या नियंत्रित करणे आवश्यक असल्याने, नवीन रिक्षांना कोणतीही परवानगी दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

रिक्षा मीटर केवळ मान्यताप्राप्त वितरकांकडूनच खरेदी करावे लागतील. तसेच, मीटर दुरुस्तीसाठी आवश्यक व्यवस्थाही केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
ऑटो चालक आणि प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ही योजना काळजीपूर्वक लागू केली जाईल. ऑटो चालक संघटनांनी याला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
सध्या बेळगाव जिल्ह्यात ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित टॅक्सी सेवांची गरज नाही, असेही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावेळी सांगितले. यामुळे स्थानिक रिक्षा चालकांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे बेळगावातील रिक्षा सेवा अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.