बेळगाव लाईव्ह :नागरी विकासावर लक्ष ठेवण्यासाठी एक सक्रिय पाऊल म्हणून बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पथकाने महांतेशनगर (सेक्टर 12) आणि खुसरोनगर येथे दौरा करून तेथे सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांची पाहणी केली.
या दौऱ्यात परिसरातील राहणीमान सुधारण्याच्या दृष्टिकोनातून रस्ते बांधकाम आणि ड्रेनेज (गटर) प्रणालींशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
सदर पाहणी दौऱ्याप्रसंगी युवा नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखालील निरीक्षण पथकाने स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. तसेच चालू कामांचा वेग आणि दर्जाचा आढावा घेण्याबरोबरच स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या अभिप्रायाची दखल घेतली. रहिवाशांनी खराब ड्रेनेज आणि खराब झालेल्या रस्त्यांबाबत तक्रारी करण्याबरोबरच आमदारांच्या पथकाने वेळेवर हस्तक्षेप केल्याबद्दल कौतुक केले.

पाहणी दौऱ्यादरम्यान बोलताना, अमान सेठ यांनी सर्व पायाभूत सुविधांची कामे आवश्यक मानकांची पूर्तता करत वेळेवर पूर्ण होतील आणि त्यासाठी आमदार असिफ (राजू) सेठ कटीबद्ध असल्याचे सांगितले.
विकास कामे टप्प्याटप्प्याने केली जात आहेत आणि आवश्यकतेनुसार प्रगती वेगवान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाहणी दौऱ्यानंतर आमदार सेठ यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पथकाने आमच्यासाठी सार्वजनिक कल्याण ही सर्वोच्च प्राथमिकता आहे, याचा पुनरुच्चार केला. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना गुणवत्ता नियंत्रण राखण्यासाठी आणि वेळेचे पालन करण्यासाठी सूचना केल्या.