बेळगाव लाईव्ह :एलपीजी गॅस, डिझेल पेट्रोल वगैरे जीवनावश्यक गोष्टींची दरवाढ करून देशातील सर्वसामान्य जनतेवर अन्याय केल्याचा आरोप करत भारतीय युवा काँग्रेस बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज सकाळी शहरात आंदोलन छेडून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच दरवाढीच्या विरोधात मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
भारतीय युवा काँग्रेसच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे युवा काँग्रेस नेते राहुल जारकीहोळी, आमदार असिफ (राजू) सेठ बेळगाव जिल्हा ग्रामीण युवा काँग्रेस अध्यक्ष कार्तिक पाटील, शहर अध्यक्ष सागर दिवटगी व चिक्कोडी जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष सिद्दिक अंकलगी यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल औषधे बांधकाम साहित्य गॅस सिलेंडर वगैरे जीवनावश्यक गोष्टींची दरवाढ केल्याबद्दल केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात शहर व जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते हातात निषेधाच्या फलकांसह काँग्रेसच्या चिन्हाचे आणि खासदार राहुल गांधी यांचे छायाचित्र असलेले ध्वज घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी पोलिसांनी मोर्चाला रोखले. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भ्रष्ट भाजप सरकारचा धिक्कार असो, मोदी हटावो देश बचावो वगैरे घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर पोलिसांनी बॅरिकेड हटवून राहुल जारकिहोळी यांच्यासह निवडक युवा काँग्रेस नेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यास सोडले. त्यांच्या हस्ते निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशनी यांनी पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनाप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राहुल जारकीहोळी यांनी सांगितले की, एलपीजी गॅस सिलेंडर दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या इंधनाचे दर कमी असताना देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. याच्या निषेधार्थ आम्ही भारतीय युवा काँग्रेसतर्फे बेळगाव जिल्हासह राज्यभरात आंदोलन छेडले आहे. केंद्र सरकारने गॅस, डिझेल, पेट्रोल वगैरेंची केलेली दरवाढ तात्काळ मागे घेऊन ती कमी करावी अशी मागणी या आंदोलनाद्वारे आम्ही करत आहोत. कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून ज्या कांही गॅरेंटी योजना आणि विकास कामांचे आश्वासन देण्यात आले होते त्याची पूर्तता केली जात आहे.
तथापि केंद्र केंद्रातील भाजप सरकारने मात्र दिलेल्या आश्वासनांची गेल्या दहा वर्षात पूर्तता केलेली नाही. वर्षाला 4 कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल वगैरे सारखी अनेक आश्वासन भाजप सरकारने दिली असली तरी त्यापैकी एकाचीही पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला नाही. कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार मात्र दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पाचही गॅरंटी योजनांची अंमलबजावणी करत आहे.
सर्वसामान्य आणि गरीब जनतेच्या हितासाठी कार्य करणारे हे सरकार आहे. या उलट केंद्रातील भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचे निषेधार्थ आम्ही हे आंदोलन करत आहोत, असे राहुल जारकीहोळी यांनी सांगितले. यावेळी आमदार असिफ सेठ व इतर युवा काँग्रेस नेत्यांनी जीवनावश्यक गोष्टींच्या दरवाढीचा निषेध करून केंद्रातील भाजप सरकार विरोधात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.