बेळगाव लाईव्ह :गेल्या 2018 मध्ये निवडणूक आचार संहिता काळात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यातून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह अन्य 9 जणांची आज सोमवारी बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे गेल्या 12 एप्रिल 2018 रोजी निवडणूक आचारसंहितेच्या काळात कुस्ती स्पर्धेदरम्यान बेळगाव दक्षिणच्या आमदारांविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपाखाली भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातील निवडणूक भरारी पथकाचे प्रमुख सहाय्यक कार्यकारी अभियंता एस. बी. नाईक यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून भिडे गुरुजींसह अन्य 9 जणांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 188, कर्नाटक पोलीस कायदा 1963 च्या कलम 37, 109 आणि जन प्रतिनिधित्व (सुधारित) कायद्याच्या 125 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणात संभाजी भिडे गुरुजींसह मारुती परशराम कुगुजी, प्रदीप लक्ष्मण देसाई, विलास मोनाप्पा नंदी, दत्तात्रय गुणवंत पाटील, मधु गणपती पाटील, भोला उर्फ नागेंद्र हनुमंत पाखरे, दुधाप्पा चांगाप्पा बागेवाडी आणि लक्ष्मीकांत नारायण मोदगेकर यांचा समावेश होता. यामधील मारुती परशुराम कुगजी यांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून सीआरपीएफचे बसवराज यमणप्पा काशीदार यांनी काम पाहिले होते. सदर खटल्याची आज सोमवारी अंतिम सुनावणी होऊन संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह उर्वरित सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार आणि ॲड. हेमराज बेंचन्नावर यांनी काम पाहिले.यावेळी वकील मारुती कामनाचे यांच्या सह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते.