बेळगाव लाईव्ह :दरोडेखोरांला सशस्त्र टोळीने घरामध्ये फिल्मी स्टाईलने शिरून एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न केल्याची आणि आरडाओरडा होताच पलायन केल्याची खळबळजनक घटना शहरातील बुडा कार्यालयाजवळील असद खान सोसायटी येथे आज दुपारी 1: 30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दिवसाढवळ्या या पद्धतीने धाडसी सशस्त्र दरोडा घालण्याचा प्रयत्न झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरोडेखोरांनी ज्या रिअल इस्टेट व्यवसायिकाच्या घरावर हल्ला केला त्यांचे नांव मैनुद्दीन पठाण असे असून ते बुडा कार्यालयानजीकच्या असदखान सोसायटीमध्ये आपल्या पत्नी व मुली समवेत राहतात.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच सशस्त्र दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईलने बंदुकीचा धाक दाखवत आज शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पठाण यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मेनूद्दीन यांची पत्नी व मुलीवर बंदूक ताणून त्यांच्याकडे घरातील पैसे आणि दागदागिन्यांची मागणी केली. प्रारंभी घाबरलेल्या पठाण कुटुंबीयांनी नंतर धीर एकवटून दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा घरातील पैसे आणि किमती ऐवज झटपट लुटण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांनी मैनुद्दीन यांना घरातील शौचालयात तर त्यांच्या पत्नी व मुलीला स्नानगृहात कोंडून घातले.
त्यावेळी प्रसंगावधान राखून मैनुद्दीन पठाण यांनी शौचालयाच्या खिडकीच्या काचा फोडून मदतीसाठी आरोळ्या ठोकल्या. त्यांच्या आरडाओरडीमुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. दिवसाढवळ्या घडलेल्या दरोड्याच्या या धाडसी प्रयत्नामुळे परिसरात खळबळ उडून हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच मार्केट आणि माळ मारुती पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पठाण यांच्या घरी दाखल होऊन पाहणी केली. यावेळी ठसे तज्ञ आणि पोलीस श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून दरोडेखोरांना शोधण्यासाठी एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तपास सुरू आहे. दरम्यान शहर आणि परिसरातील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रिअल इस्टेट व्यावसायिक म्हणून मैनुद्दीन पठाण यांच्या घरातील दरोड्याच्या प्रयत्नाच्या घटनेमुळे तर शहर सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. तथापि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पठाण यांच्या घरात दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांना लवकरात लवकर गजाआड केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.
