बेळगाव लाईव्ह :सध्याचे उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन श्री चांगळेश्वरी व श्री कलमेश्वर यात्रेनिमित्त सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व अभियंता गोविंद टक्केकर यांच्या श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स फर्मतर्फे येळ्ळूर येथे टँकरद्वारे मोफत पिण्याचे पाणी पुरवठा उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा शुभारंभ आज झाला.
येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील श्री चांगळेश्वरी मंदिरासमोर आज सोमवारी सकाळी पाण्याच्या टँकरचे पुष्पहार घालून पूजन करण्याबरोबरच श्रीफळ वाढवून पाणी पुरवठा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे गोविंद टक्केकर यांच्यासह येळ्ळूर गावातील पंच आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण न होता यात्रा काळात गावकऱ्यांची सोय व्हावी या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते व अभियंता गोविंद टक्केकर हे स्वखर्चाने सदर उपक्रम राबवत असल्याबद्दल स्थानिक पारायण मंडळ व गावकऱ्यांतर्फे त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

टँकरद्वारे पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना अभियंता गोविंद टक्केकर यांनी येळ्ळूर गावातील श्री चांगळेश्वरी व कलमेश्वर यात्रेनिमित्त आपण ही मोफत पाणीपुरवठा योजना राबवत असल्याचे सांगितले.
तसेच नागरिकांनी विशेष करून महिलावर्गाने पाण्याची नासाडी न करता या योजनेचा सदुपयोग करून घ्यावा. येळ्ळूरसह सुळगे-येळ्ळूर व धामणे येथे या पद्धतीने श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स अँड इंजिनीयरकडून पाणी पुरवठा योजना राबवली जात असून यापुढे उन्हाळा संपेपर्यंत ही योजना अशीच सुरू राहील असे टक्केकर यांनी स्पष्ट केले.