बेळगाव लाईव्ह :बेंगलोर आणि धारवाड दरम्यानची ‘वंदे भारत’ रेल्वे सेवा बेळगावपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला असून तो लवकरच मंजूर होईल, अशी ग्वाही नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मुकुल शरण माथूर यांनी आपल्याला दिल्याचे बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांना एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांनी हुबळी येथे नैऋत्य वलय रेल्वे महाव्यवस्थापक मुकुल शरण माथुर यांची भेट घेऊन बेळगाव लोकसभा मतदार संघात रेल्वेशी संबंधित आवश्यक असणाऱ्या विकास कामांसंदर्भात माहिती जाणून घेतली. बेळगाव मतदार संघातील सुळेभावी गावातील एलसी क्र. 79/ए जवळील नव्याने बांधलेला रोड अंडर ब्रिजमुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. शेतकऱ्यांची गैरसोय कमी करण्यासाठी येथे जोडणारा रस्ता बांधण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, अशी विनंती खासदार शेट्टर यांनी बैठकीत केली.
त्यावर रेल्वे महाव्यवस्थापक माथुर यांनी यासंदर्भात अहवाल देण्यासाठी वरिष्ठ अभियंत्यांना पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. लोकापूर -रामदुर्ग -सौंदत्ती -धारवाड या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी प्राथमिक सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. या संदर्भात आवश्यक सर्वेक्षण करण्याकरिता आणि नवीन रेल्वे मार्गाचे बांधकाम सुलभ करण्यासाठी कारवाई करण्याचा प्रस्ताव व दिला आहे. या प्रकरणाची आवश्यक माहिती घेतली जाईल आणि येत्या कांही दिवसात नवीन रेल्वे मार्ग सर्वेक्षण करण्याचा विचार केला जाईल असे सांगून नवीन बेळगाव -कित्तूर -धारवाड रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होताच निविदा मागविल्या जातील आणि काम सुरू केले जाईल, अशी माहिती रेल्वे महाव्यवस्थापक मुकुल शरण माथुर यांनी दिली.
बेंगलोर आणि धारवाड दरम्यानची ‘वंदे भारत’ रेल्वे सेवा बेळगावपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला असून तो लवकरच मंजूर होईल, अशी ग्वाही यावेळी महाव्यवस्थापक माथूर यांनी खासदार शेट्टर यांना दिली. तसेच बेळगाव शहरातील एलसी क्रमांक 381, 382, 383 जवळ बांधण्यात येणाऱ्या रोडवर ब्रिज बाबतच्या प्रगतीचा तपशील रेल्वे महाव्यवस्थापकांना खासदारांना दिला. सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि काम लवकरच सुरू होणार आहे. बंद करण्यात आलेली बेळगाव ‘मुनगुरू एक्सप्रेस रेल्वे सेवा पुनश्च सुरू करावी अशी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे ती रेल्वे सेवा सुरू करावी अशी विनंती खासदाराने केली.
त्यावर सदर रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्याबरोबरच बेळगाव -मिरज -बेळगाव दरम्यान धावणाऱ्या रेल्वेचे मेमू रेल्वे मध्ये रूपांतर करण्याबाबत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती देखील नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मुकुल शरण माथुर यांनी दिली एकंदर सदर बैठकीतील चर्चा फलदायी ठरली असून मी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
त्यामुळे येत्या काळात बेळगाव लोकसभा मतदार संघातील रेल्वेशी संबंधित मागण्यांची पूर्तता होण्याची आशा बाळगण्यास हरकत नसल्याचे बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.