बेळगाव लाईव्ह :बेळगाव – वेंगुर्ला रस्त्यावरील सुपे आरटीओ नाक्यानजीकच्या अवघड वळणावर ट्रक आणि चंदगड डेपोच्या एसटी बसची जोरदार धडक झाली. यामध्ये एसटी चालकाचा जागीच मृत्यू झाला.
लक्ष्मण पांडुरंग हळदणकर ( रा. चंदगड) असे चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

याबाबत समजलेल्या अधिक माहिती अशी की, आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. यावेळी (के ए २५ ए बी ९७७५) या ट्रकने बेळगावला जाणाऱ्या (एमएच १४ बी टी १५४१) बसला जोराची धडक दिली. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर वाहक सुरेश मर्णहोळकर ( रा. घुल्लेवाडी, ता. चंदगड) यांच्यासह ९ प्रवासी गंभीर जखमी झाले. यामधील अत्यवस्थ असलेल्या चार जणांना बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर ६ प्रवाशांना चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे २ तास वाहतुकीची कोंडी झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चंदगड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
बेळगाव – वेंगुर्ला रस्त्यावरील सुपे आरटीओ नाक्या नजीकच्या वळणावर आज अखेर शेकडो बळी गेले आहेत. हे वळण म्हणजे मृत्यूचा सापळाच आहे. वळण काढण्यासाठी शासनाकडे अनेक वेळा निवेदने व तक्रारी प्रवाशांनी दिल्या होत्या. मात्र, याची दखल घेण्यात आली नाही. आज या वळणाची पुन्हा एकदा घटनास्थळी चर्चा होती.