बेळगाव लाईव्ह: दुरुस्तीच्या कारणास्तव कपिलेश्वर येथील उड्डाणपूल बंद करण्यात आल्यामुळे आज सकाळपासून पलीकडच्या बाजूला असलेल्या जुन्या पी. बी. रोड उड्डाण पुलावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. परिणामी या पुलाच्या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनचालकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोणताही एक रस्ता जर बंद झाला तर बेळगाव बेळगाव शहरात त्या बंद रस्त्यामुळे ट्रॅफिक समस्या उद्भवत आहेत यामुळे रहदारी सहन न करणारे शहर बनला आहे असा आरोप होऊ लागला आहे.तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी आज बुधवार सकाळपासून कपिलेश्वर उड्डाणपूल बॅरिकेड्स घालून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नेहमी या पुलाचा वापर करणाऱ्या वाहन चालकांना आज मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यापूर्वी कपिलेश्वर उड्डाण पुलाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण झाली तर शहराच्या दक्षिण व उत्तर भागातील नागरिक व वाहन चालकांकडून ये -जा करण्यासाठी जवळच्या तानाजी गल्ली रेल्वे गेट मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर केला जात होता. मात्र अलीकडे तानाजी गल्लीचे रेल्वे गेटही जनविरोध डावलून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आज कपिलेश्वर उड्डाणपूल रहदारीसाठी बंद करण्यात येताच वाहनचालकांचा गोंधळ उडाला.
रेल्वे मार्ग ओलांडून पलीकडे कसे जायचे हे कळेनासे झाल्याने अनेकांनी आपली वाहने जुन्या पी. बी. रोड वरील उड्डाण पुलाच्या दिशेने वळवली. परिणामी सध्या या पुलाच्या ठिकाणी वाहनांची एकच गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
त्यामुळे वाढत्या उन्हात वाहन चालकांना बराच काळ एकाच ठिकाणी तिष्ठत थांबण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे तानाजी गल्ली येथील रेल्वे फाटक बंद झाल्याने अगोदरच कपिलेश्वर उड्डाण पूल आणि ओल्ड पीबी रोड उड्डाण पुलावर अतिरिक्त ट्रॅफिकचा भार आहे आणि त्यातच दुरुस्तीसाठी एक उड्डाणपूल बंद झाल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
जर याची तात्काळ दखल घेऊन रहदारी पोलिसांनी आवश्यक उपाययोजना न केल्यास किंवा कपिलेश्वर उड्डाण पुलाचे दुरुस्तीचे काम त्वरेने पूर्ण न झाल्यास दिवसभरात पी. बी. रोड उड्डाणपुलाच्या ठिकाणची वाहतूक कोंडीची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.