बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात भरदिवसा तरुणाला जबरदस्तीने दुचाकीवरून नेऊन प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलीस तपास सुरू आहे.
बेळगाव शहरातील कोनवाळ गल्ली परिसरातील ‘स्पेअर स्पोर्ट्स शॉप’मध्ये काम करणाऱ्या शिवराज मोरे या युवकावर सुमारे १० हल्लेखोरांच्या टोळक्याने जबरदस्तीने दुचाकीवरून नेऊन प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही तरुण दुकानात येऊन शिवराजला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेत असल्याचं दिसून येत आहे.
हल्लेखोरांनी त्याला दुचाकीवरून अनवधानाने एका सुनसान जागी नेऊन मारहाण केली. या हल्ल्यात शिवराज गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर बीम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी जखमी युवकाच्या आईने टिळकवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरकोळ कारणावरून शिवराजला दुकानातून जबरदस्तीने नेऊन मारहाण करण्यात आली. याप्रकरणी हल्लेखोरांचा शोध घेऊन पोलीस पुढील तपास घेत आहेत.