बेळगाव लाईव्ह :बेळगाव टेक्नॉलॉजी कंपनीज असोसिएशन (BeTCA) तर्फे बेळगाव इंडस्ट्री मीट २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. फेअरफिल्ड बाय मॅरियट, गोगटे प्लाझा, बेळगाव येथे ही मीट झाली. या कार्यक्रमात १०० पेक्षा अधिक नामांकित उद्योजक व व्यावसायिक सहभागी झाले होते, ज्यामुळे बेळगाव हे शहर तंत्रज्ञान नवोन्मेषाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे हे अधोरेखित झाले.
या बैठकीचा उद्देश पारंपरिक उद्योग आणि वाढत्या टेक्नॉलॉजी क्षेत्रामधील सहकार्य वाढवणे हा होता. स्थानिक तंत्रज्ञान कंपन्यांनी डिजिटल मार्केटिंग, एरोस्पेस, एम्बेडेड सिस्टिम्स, ऑनलाइन अकाउंटिंग, ईआरपी सोल्युशन्स, कस्टमाईज्ड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाऊड स्टोरेज व सायबर सिक्युरिटी यांसारख्या विविध क्षेत्रांतील सेवा सादर केल्या.
अनेक उद्योजकांसाठी बेळगाव मध्ये इतक्या उच्च दर्जाचे आणि विविध तंत्रज्ञान उपाय उपलब्ध आहेत, हे महत्त्वपूर्ण ठरले. स्थानिक पातळीवर तयार होत असलेल्या जागतिक दर्जाच्या सोल्युशन्सचे कौतुक करण्यात आले.
औपचारिक सत्रांमध्ये, BeTCA ने त्यांच्या व्हिजनबद्दल माहिती दिली की, कसे एक स्थिर इकोसिस्टिम तयार करून पारंपरिक उद्योग आणि तंत्रज्ञान कंपन्यांचा परस्पर विकास साधला जाऊ शकतो.
BeTCA तर्फे आर. के. पाटील यांनी सांगितले की, येथे असलेली विविध क्षेत्रातील कौशल्ये दाखविण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. यानंतर, BeTCA मधील सर्व कंपन्यांसोबत आणि इतर उद्योगांसोबत घनिष्ठपणे काम करू, आणि बेळगाव ने तंत्रज्ञान क्षेत्रात आपला ठसा उमठवावा यासाठी प्रयत्न करू, कारण अनेक वर्षे याबद्दल काहीच प्रयत्न दिसले नाहीत.”
कार्यक्रमानंतरच्या नेटवर्किंग सत्रात मोठ्या प्रमाणावर संवाद साधण्यात आला, आणि अनेक उद्योजकांनी स्थानिक तंत्रज्ञान कंपन्यांशी त्वरित सहकार्य सुरू करण्याची इच्छा दर्शवली.
उद्योग क्षेत्रातील काही प्रमुख व्यक्तींनी आपले विचार मांडले. संदीप बागेवाडी, सचिव, BDSSIA, म्हणाले,
“BeTCA ने उद्योग संघटनांसोबत अधिक बैठकांचे आयोजन करावे, त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि योग्य सोल्युशन्स प्रदान करावीत.”
रोहित देशपांडे यांनी त्यांचा अनुभव शेअर करत सांगितले,
“आमच्या कार डिलरशिप आणि हेल्थकेअर युनिटसाठी स्थानिक टेक्निकल सहाय्यामुळे आम्हाला प्रचंड खर्च आणि वेळ वाचवता आला.”

सिद्धार्थ हुंदरे, व्यवस्थापकीय संचालक, पॉलीहायड्रॉन, म्हणाले,
“BeTCA च्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. असे सातत्याने संवाद होत राहिल्यास आमच्या उत्पादनक्षमतेत नक्कीच वाढ होईल.”
रोहन जुवळी, संचालक, मायनेक्स अॅलॉइज प्रायव्हेट लिमिटेड, म्हणाले,
“याआधी आम्ही तांत्रिक उपायांसाठी बंगलोर आणि मुंबई सारख्या शहरांवर अवलंबून होतो. हा कार्यक्रम खरोखरच डोळे उघडणारा ठरला — हाच दर्जा बेळगाव मध्येही आहे हे आज समजले. आपण स्थानिक तंत्रज्ञान कंपन्यांना बळ द्यावे, कारण त्यांची प्रगती आमच्या प्रगतीला मदत करेल.”
बेळगाव इंडस्ट्री मीट २०२५ ही बैठक तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि पारंपरिक उद्योगांमधील बंध अधिक बळकट करणारी महत्त्वाची पायरी ठरली आहे. BeTCA पुढेही सहकार्य आणि परस्पर विकास यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
BeTCA विषयी
बेळगाव टेक्नॉलॉजी कंपन्यांची संघटना (BeTCA) ही एक नोंदणीकृत सेक्शन ८ ना-नफा संघटना आहे, जी बेळगाव तील टेक्नॉलॉजी इकोसिस्टमच्या वृद्धीसाठी काम करते. BeTCA नाविन्य, उद्यमशीलता व उद्योग विकासाला चालना देण्यासाठी एक सशक्त सहकार्याचे वातावरण निर्माण करत आहे.