बेळगाव लाईव्ह :टीचर्स कॉलनी, खासबाग येथे प्यास फाउंडेशनच्या माध्यमातून पुनरुज्जीवित करण्यात आलेली विहीर बेळगाव महापालिकेकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
या पद्धतीने टिळकवाडी, शहापूर आणि खासबाग या भागाच्या केंद्रस्थानी असलेली 150 वर्षे जुनी ब्रिटिशकालीन बांधकाम असलेली खासबागची मत्तीकोप विहीर दशकांच्या दुर्लक्षानंतर पुन्हा जिवंत झाली आहे.
सदर विहिरीला प्यास फाउंडेशनने एकेपी फेरोकास्ट्स आणि बेम्को हायड्रॉलिक्सच्या सीएसआर सहाय्याने केलेल्या संयुक्त प्रयत्नांमुळे तिचे पूर्वीचे वैभव पुनश्च प्राप्त झाले आहे. आता शुद्ध निळे पाणी आणि जवळजवळ 30 फूट खोली असलेली ही विहीर न आटता दररोज 1,000 टँकरपर्यंत पाणी पुरवू शकते.
संरचनात्मक पुनर्संचयनासोबतच तिच्या सभोवती वृक्षारोपण देखील करण्यात आले आहे. पुनर्जीवित केलेली ही विहीर काल सोमवारी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते बेळगाव महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रोशन यांनी प्यास फाउंडेशनने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून फाउंडेशनच्या भविष्यातील उपक्रमांमध्ये संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आयुक्त शुभा यांनी योजना आखून शक्य तितक्या लवकर पाण्याचा पुरेपूर वापर करण्याचे आश्वासन दिले.
विहीर हस्तांतरण कार्यक्रमाचे औचित्य साधून एकेपी फेरोकास्ट्सचे राम भंडारे, पराग भंडारे, बेम्कोचे अनुरुद्ध मोहता यांना त्यांच्या पाठिंब्याबद्दल सन्मानित करण्यात आले. प्रारंभी प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि प्रास्ताविकात फाउंडेशनच्या ध्येयाची रूपरेषा सांगितली. कार्यक्रमास प्यास फाउंडेशनचे सदस्य अभिमन्यू डागा, प्रीती कोरे, सूर्यकांत हिंडलगेकर, अवधूत सामंत, दीपक ओऊळकर, सतीश लाड, रोहन कुलकर्णी, लक्ष्मीकांत घसारी आदींसह शिक्षक कॉलनीतील उत्साही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.