बेळगाव लाईव्ह :सामाजिक बांधिलकीची जाण असलेला माणूस कितीही मोठा झाला तरी लहान लहान कामांमधून समाजसेवेचा त्याचा गुणधर्म दिसून येत असतो. हे पुन्हा एकदा मराठा मंदिर बेळगावचे अध्यक्ष उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी दाखवून दिले आहे.
उद्यमबाग, तिसरा क्रॉस येथील डी मार्ट समोर काल सोमवारी रात्रीपासून एक ट्रक रस्त्यावर बंद पडला होता. परिणामी आज मंगळवारी सकाळपासून सदर रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढली होती.
सदर बाब कानावर येताच सामाजिक कार्यकर्ते उद्योजक मराठा मंदिराचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी त्यांनी रहदारी पोलिसांना रस्त्यावर बंद पडलेल्या ट्रक आणि वाहतूक कोंडीबद्दल माहिती दिली.
तसेच घटनास्थळी दाखल होऊन गुरव यांनी बंद पडलेल्या ट्रकमुळे निर्माण झालेला अडथळा दूर करून त्या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या पद्धतीने लहान लहान गोष्टी मधून देखील आपण सामाजिक बांधिलकी जपू शकतो हेच उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी दाखवून दिले आहे.
उद्यमबाग, तिसरा क्रॉस येथील डी मार्ट समोरील रस्ता हा सततच्या रहदारीचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर एखादे वाहन बंद पडल्यास रहदारीस अडथळा निर्माण होतो. तसेच अल्पावधीत वाहतुकीची मोठी कोंडी होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
याची कल्पना असल्यामुळे आप्पासाहेब गुरव यांनी रस्त्यावर बंद पडलेला ट्रक हटवण्यास तात्काळ सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. पूर्वीपासून समाजकार्याची आवड असणारे उद्योजक आप्पासाहेब गुरव सातत्याने या ना त्या माध्यमातून समाज सेवा करत असतात.

आज बंद पडलेल्या ट्रकचा अडथळा दूर करण्याच्या आपल्या कृतीतून त्यांनी समाज सेवेसाठी खास वेळ काढण्याची गरज नसते, रस्त्यावरून सहज ये-जा करताना देखील लहान लहान कृतीतून आपण ती करू शकतो हे दाखवून दिले आहे.