बेळगाव लाईव्ह: बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या शासकीय निवासस्थानी दुर्मिळ रंगाचा धामण आढळला आहे. सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी या सापाला पकडून जीवनदान दिले आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी अचानक गेटमधून आत साप शिरला यामुळे येथील सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचारी व येथील स्वच्छ्ता कर्मचारी यांची तारांबळ उडाली होती. त्यावेळी लागलीच सर्पमित्र आनंद चिट्टी यांना पाचारण करण्यात आले.
चिट्टी घटनास्थळी पोहोचले तो पर्यंत साप बांबू च्या झाडावर चढून बसला. सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या सापाला महत प्रयासाने खाली आणले व शिताफीने पकडले.
हा साप 4 वर्षाचा सामान्य धामण जातीचा असूनही दुर्मिळ रंगाचा आहे. धामण सापाचा पाठीपर्यंतचा भाग एक सारखाच असतो पण या सापाच्या उजव्या गळ्यावर व पोटाकडील भागावर काळ्या रंगाचा शिडकावा आहे.
मादी जातीचा, 5 फूट लांबीचा हा साप चुकून बाहेरून आला असला तरी यापूर्वीही बहुंताश साप येथे धामण जातीचे सापडले आहेत. या सापा पासून मानवाला धोका नाही असे सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी सांगितले.