बेळगाव लाईव्ह : बेळगाव दक्षिण मतदार संघातील येळ्ळूर गावातील मराठी शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त शरद पवार यांचा दौरा सुरु झाला.
शुक्रवारी सायंकाळी पवार बेळगावमध्ये दाखल झाले आणि राष्ट्रवादी इंजिनियर सेलचे अध्यक्ष अमित देसाई यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी, देसाई यांनी शरद पवारांना बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रातील घसरलेल्या स्थितीविषयी माहिती दिली.
अमित देसाई यांनी पवारांना शहराच्या औद्योगिक समस्यांचा सखोल आढावा दिला, ज्या समस्यांमुळे बेळगावमधील औद्योगिक क्षेत्राला गंभीर संकटांचा सामना करावा लागतो. यामध्ये औद्योगिक गतीची कमी होणे आणि नोकऱ्यांची घट हे प्रमुख मुद्दे होते.

शनिवारी, शरद पवार येळ्ळूर येथील मराठी शाळेच्या शतक महोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी अमित देसाई यांच्या निवासस्थानी भेट देऊन सीमाभागातील विविध मान्यवरांशी संवाद साधला.
युवक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शरद पवारांना भेट देऊन त्यांच्या समोर बेळगावमधील युवकांवरील कर्नाटक प्रशासनाच्यावतीने दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. तसेच शेती आणि उद्योग क्षेत्राच्या उन्नतीसाठी शरद पवार यांच्याशी उपस्थितांनी चर्चा केली. यावेळी माजी महापौर सरिता पाटील, युवा उद्योजक कपिल भोसले, उमेश चौगुले, चंद्रकांत कोंडुसकर, अंकुश केसरकर श्रीकांत कदम किरण हुद्दार, विक्रम पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.