बेळगाव लाईव्ह :शेत जमिनीचा गैरफायदा घेऊन केल्या जाणाऱ्या गैर कृत्यांच्या वाढत्या घटनांना कंटाळून सावगावच्या ग्रामस्थांनी अलिकडेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून नानावाडी रोडवरील शेतात आणि धरण परिसरात वारंवार आक्षेपार्ह कृत्ये करणाऱ्या मद्यपींसह प्रेमी युगुलांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
मागणीची दखल घेत बेळगाव ग्रामीण पोलिसांनी प्रभावित भागात तात्पुरती गस्त वाढवल्यामुळे कांही प्रमाणात दिलासा मिळाला होता. तथापि, ही गस्त अल्पकाळ टिकली आणि ती मागे घेण्यात आल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाल्याचे वृत्त आहे.
सावगाव आणि परिसरातील निर्जन भागात पुन्हा दारू व ड्रग्जचा वापर करणारे नशेबाज आणि प्रेमी युगुल यांची संख्या वाढत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी स्थानिक युवकांनी शेत परिसरात खुलेआम अश्लील चाळे करणाऱ्या एका प्रेमीयुगुलाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला होता.
त्यावेळी संबंधित गैरवर्तन करणाऱ्या युगुलाला समज देण्याऐवजी त्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गैर कृत्यास आळा घालणाऱ्या संबंधित युवकांवर नैतिक पोलिसिंगच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त केली जात असून आणि सामाजिक नीतिमूल्य जपणाऱ्या संबंधित युवकांवर नव्हे तर नीतीमूल्य पायदळी तुडवणाऱ्या कारवाई केली जावी यासाठी मोर्चाही काढण्यात आला होता.
गेल्या कांही वर्षांपासून सावगाव धरण परिसर ‘ओल्या पार्ट्या’साठी एक हॉटस्पॉट बनला आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या ठिकाणी उघडपणे दंगा घालत मद्यपान केले जाते. या रंगीत पार्ट्यांद्वारे शेतजमिनी धुडगूस घालून अस्वच्छता पसरवली जाते दारूची पाकिटे बाटल्या हितच तथा फेकल्या जातात. बऱ्याचदा बाटल्या फोडून टाकल्या जातात ज्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. सध्या काजू आणि आंबा कापणीचा हंगाम सुरू असल्याने अनेक शेतकरी, विशेषतः महिला, शेतात काम करत आहेत. परंतु मद्यधुंद युवकांच्या शेतातील वावरामुळे विशेष करून महिला शेतमजुरांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात गावकऱ्यांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार करून देखील त्याकडे डोळेझाक केली जात आहे. नानावाडी रोडवर कांही ठिकाणी पोलिसांकडून तपासणी करण्यात येत असली तरी कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवाशांची चौकशी करणे, एवढेच काम पोलिसांकडून केले जाते. त्यानंतर पुढे जी समस्या निर्माण होणार आहे त्याकडे पोलीस प्रशासन संपूर्ण दुर्लक्ष करत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिकांचा आरोप आहे की कायद्याच्या अंमलबजावणीच्या नावाखाली वाहन चालकांकडून अंदाधुंदपणे दंड वसूल करून अप्रत्यक्षरीत्या पुढील गैर कृत्यासाठी परवानगी देत आहेत. ज्यामुळे सावगाववासियांच्या त्रासात भर पडली आहे. आता ग्रामस्थांची मागणी आहे की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि शांतता आणि सुरक्षितता पुनर्संचयित करण्यासाठी परिसरात सतत गस्त घालावी.