बेळगाव लाईव्ह : रस्त्याच्या कडेला कचरा टाकणे आणि कचरा जाळण्याचे प्रकार बेळगाव शहर परिसरात वाढले आहेत. येळ्ळूर रोडवर के.एल.ई. हॉस्पिटल नजीक रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला कचरा कोणा अज्ञाताने पेटवून दिल्यामुळे दुर्गंधीयुक्त प्रचंड धूर सुटल्याने परिसरातील रहिवाशांसह शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
येळ्ळूर रस्त्यावर के.एल.ई. हॉस्पिटल शेजारी परिसरातील परिसरातील नागरिकांसह ये-जा करणारे लोक मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. रस्त्याशेजारी निर्माण झालेल्या कचऱ्याच्या साम्राज्यामुळे येथून जाताना नाक मुठीत धरून जावे लागते. त्यात भर म्हणून बेवारस कुत्र्यांच्या कळपाचा या ठिकाणी वावर असतो. तथापी आज सकाळीच कोणी अज्ञाताने तेथील संपूर्ण कचऱ्याला आग लावल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त धूर पसरत आहे.
ज्याचा त्रास रस्त्याचा वापर करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना त्याचप्रमाणे स्थानिक रहिवाशांसह शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून स्मार्ट सिटी म्हणतात ती हिच का? असा संतप्त सवाल केला जात आहे.
या भागात कचरा गोळा करणाऱ्या महिला घरोघरी जाऊन प्रत्येक घरगुती कचऱ्याचा डबा घराबाहेर ठेवण्याची सूचना करत आहेत. तसेच मनपाने पाठविलेल्या व्यक्तीकडून कचऱ्याच्या डब्या समवेत नागरिक व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे फोटो काढून घेतले जात आहेत. घरगुती कचरा पालिकेच्या गाडीकडे द्या, सार्वजनिक ठिकाणी तो जाळण्यास मनाई आहे असेही सांगितले जात आहे.
दुसरीकडे राजरोसपणे येळ्ळूर रस्त्याच्या बाजूला कचरा टाकणाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तरी महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर अथवा पेटवणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.