बेळगाव लाईव्ह : रामदुर्ग तालुक्यातील शबरीकोळ्ळ या पवित्र स्थळाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून १०० कोटींचा निधी जाहीर झाल्यानंतर आता पुढील टप्प्यातील कामकाजावर लक्ष केंद्रित केलं जात आहे.
रामायणातील शबरीमातेचे वास्तव्य लाभलेलं शबरीकोळ्ळ हे स्थळ आता धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यात असलेल्या या स्थळाच्या विकासासाठी ‘आयकॉनिक टुरिझम’ योजनेअंतर्गत केंद्र सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.
या संदर्भात खासदार जगदीश शेट्टर यांनी जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने राज्य पर्यटन खात्याला तातडीने उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
शबरीकोळ्ळमध्ये सध्या प्राथमिक सुविधांचा अभाव असून, रस्ते, पाणी, विजेची व्यवस्था, धार्मिक वास्तूंचं सुशोभीकरण, आणि भक्तांसाठी निवासव्यवस्था यांची गरज आहे.
आता मंजूर निधीतून मंदिराचा जीर्णोद्धार, दोन तळ्यांची स्वच्छता, परिसरातील हरितावरण जतन, फोटोग्राफी पॉइंट्स, पार्किंग व्यवस्था, शौचालये आणि दिशा फलक आदी सुविधा उभारल्या जाणार आहेत.
या विकासामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील महिन्यात प्रथम टप्प्यातील कामांना सुरुवात होण्याची शक्यता असून, स्थानिक प्रशासन व पर्यटन विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.