बेळगाव लाईव्ह : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला शहाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली असून सदर मागणी बेळगावमधील शिवसंत संजय मोरे यांनी केली आहे. सरकारने यासंदर्भात ठराव करून निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गास छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, त्यांनी यापूर्वी देखील अनेकवेळा असे आवाहन केले आहे.
यासंदर्भात तळबीडचे जयाजीराव मोहिते यांनीदेखील यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले होते. पुणे-मुंबई महामार्गास यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवे असेही नाव देण्यात आले आहे.
या शिवाय मुंबई नागपूर हायवेला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पुणे-बेंगळुरू महामार्गाला शहाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी संजय मोरे यांनी केली आहे.
पुणे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होय सातारा ही शाहू महाराजांनी स्थापन केलेल मराठ्यांची राजधानी या शिवाय कोल्हापूर ताराराणी स्थापन केलेली मराठ्यांची राजधानी
शहाजी महाराजांची बंगलोर ही राजधानी आहे त्यामुळे चार राजधानी जोडणारा हा महामार्ग आहे यासाठी या महामार्गाला शहाजी महाराजांचे नाव द्यावे असा ऐतिहासिक संदर्भ देखील मोरे यांनी दिला आहे.