बेळगाव लाईव्ह : कर्नाटक बोर्डाच्या 2025 च्या पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदाही उडपी जिल्ह्याने सर्वाधिक निकालाची टक्केवारी मिळवत अव्वल स्थान पटकावले, तर यादगिरी जिल्हा शेवटच्या क्रमांकावर राहिला. तर बेळगाव जिल्हा 26 व्या स्थानावर पोहोचला आहे.
2025 सालातील पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी राज्यातील 5,050 महाविद्यालयांतील सुमारे 7.13 लाख विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा 1 मार्च ते 20 मार्च दरम्यान राज्यभरातील 1,771 केंद्रांमध्ये पार पडली होती. मूल्यांकन प्रक्रियेसाठी राज्यभरातील 76 केंद्रांमध्ये 25,000 पेक्षा अधिक परीक्षकांनी काम पाहिले.
या परीक्षेचा निकाल शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. निकालाची संगणकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1.30 पासून https://karresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.
निकालानुसार, उडपी जिल्ह्याने 93.90 टक्के निकालासह प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या स्थानावर दक्षिण कन्नड (93.57 टक्के ) राहिला असून, यादगिरी जिल्हा 48.45टक्के निकालासह शेवटच्या क्रमांकावर राहिला.
दुसरीकडे, बेळगाव जिल्ह्याने 65.37 टक्के निकालासह राज्यात 26 वे स्थान मिळवले आहे. पुढील शैक्षणिक जिल्ह्याने 67% निकालासह राज्यात 24 वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे चिकोडी शैक्षणिक जिल्हा बेळगाव पेक्षा पुढे आहे हे मागील वर्षाप्रमाणे झाले आहे.
विशेष म्हणजे, बळ्ळारी जिल्ह्यातील संजना बायी या विद्यार्थिनीने कला शाखेत 600 पैकी 597 गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.