बेळगाव लाईव्ह : राकसकोप गावातील प्राथमिक मराठी शाळेतील आदर्श शिक्षिका सौ. पी. बी. कागनकर यांना कर्नाटक शासनाचा गुरु स्पंदन आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मंगळवार, दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी शाळेत सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या गौरव समारंभासाठी गावातील ग्रामस्थ आणि विविध समित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला ग्रामस्थ पंचमंडळ राकसकोप, सैनिक संघटना राकसकोप व शाळा सुधारणा समितीतर्फे सौ. पी. बी. कागनकर यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास ग्रामस्थ पंच कमिटीचे अध्यक्ष विलास बाबू पाटील, उपाध्यक्ष भावकु मारुती मासेकर, तसेच राकसकोप सैनिक संघटनेचे निवृत्त सुभेदार केदारी रामू मोटर व निवृत्त सुभेदार जयवंत विठ्ठल सुखये, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष उदय लक्ष्मण मोटर हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना आदर्श शिक्षिका सौ. पी. बी. कागनकर म्हणाल्या की, “हा पुरस्कार हा केवळ माझा नाही, तर माझ्या गावातील ग्रामस्थ, शाळा समिती, सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांचा आहे. हा सन्मान मला अजून अधिक निष्ठेने कार्य करण्यासाठी प्रेरणा देईल.”
ग्रामस्थ कमिटीचे सदस्य, शाळा सुधारणा समितीचे सदस्य आणि गावकरी बांधवांनि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पडलीहाळे आणि पाटील शिक्षिका यांनी सर्व मान्यवर व उपस्थित ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.