बेळगाव लाईव्ह : बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. महाराष्ट्रातील सोलापूरसह विविध भागांतून कांद्याने भरलेल्या गाड्या दाखल होत असून, बाजारात १० ते १८ रुपये प्रतिकिलो दराने कांद्याची उलाढाल होत आहे.
गुढीपाडव्यानंतर बाजारात नव्या व्यापार वर्षाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील सोलापूर येथून सुमारे २५०० ते ३००० पोती कांदा बेळगावमध्ये दाखल झाला आहे.
संपूर्ण देशात कांद्याचे उत्पादन घेतले जात असले तरी पूर्वी हे उत्पादन मुख्यत्वे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांपुरते मर्यादित होते. मात्र अलीकडील काळात कर्नाटकातही विशेषतः बेळगाव तालुका, बागलकोट, विजापूर यासह अनेक भागांत कांद्याची मोठ्या प्रमाणावर शेती केली जात आहे.
सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध हटवल्यामुळे बाजारात दरात काहीशी तफावत दिसून येते. सध्या कांद्याचे दर १० ते १८ रुपये प्रतिकिलो इतके आहेत, अशी माहिती अडत व्यापारी संभाजी होनगेकर यांनी दिली.
मात्र दर समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र जाधव यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दर फारच कमी आहेत.
बियाणे, खते, मजुरी यांचे दर वाढले आहेत. मात्र उत्पन्न त्यामानाने अत्यंत कमी आहे. खर्चही भरून येत नाही. सध्याच्या या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या अधिक गडद होत चालल्या असून, कांद्याच्या दरात स्थिरता यावी आणि योग्य हमीभाव मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.