बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (बेमुल) यांना यावर्षी १३.२० कोटी रुपयांचा विक्रमी नफा झाला आहे. शेतकऱ्यांच्या सहकार्याने आणि संघाच्या संचालक मंडळाच्या कार्यक्षम व्यवस्थापनामुळे हे यश शक्य झाल्याचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगाव येथील पत्रकार परिषदेत बोलताना जारकीहोळी म्हणाले की, अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर केवळ एका वर्षात बेमुलने ६८ लाख रुपयांहून थेट १३.२० कोटी रुपयांपर्यंतचा नफा नोंदवला आहे.
शेतकऱ्यांनी दर्जेदार दूध पुरवठा केला असून त्यामानाने त्यांना सवलती व सुविधा देण्यात आल्या आहेत. योग्य आर्थिक नियोजन, खर्चावर नियंत्रण आणि शेतकऱ्यांचा विश्वास यामुळे हा नफा शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, भविष्यात दूध उत्पादकांसाठी आकर्षक योजना राबवण्यात येणार असून यामुळे दररोज सुमारे १ लाख लिटर दूध राज्याबाहेर न जाता त्याचे स्थानिक स्तरावर प्रक्रिया होईल. यासाठी मेगा डेअरी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. योग्य ठिकाणाची पाहणी सुरू आहे आणि लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांना दूधाच्या प्रत्येक लिटरमागे ४ रुपये अतिरिक्त लाभ देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन निधीपैकी ९.४५ कोटी रुपये लवकरच त्यांच्या खात्यात वर्ग केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला बेमुलचे पदाधिकारी, संचालक, व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.