बेळगाव लाईव्ह :खानापूर-एम के हुबळी मार्गावर खानापूर तालुक्यातील गाडीकोप गावच्या हद्दीत रस्त्याला लागून असलेल्या इराप्पा जोळद यांच्या शेतवडीत, खानापूर तालुक्यातील बलोगा येथील व्यक्ती शिवनगौडा इरनगौडा पाटील (वय 48 वर्ष) याचा काल मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी रात्री खून झाला असून, याबाबत त्याचा भाऊ सन्नगौडा इरनगौडा पाटील याने खानापूर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दास्तीकोप या ठिकाणी श्री लक्ष्मीची यात्रा सुरू असून, खून झालेला व्यक्ती शिवणगौडा इरणगौडा पाटील हा व त्याची पत्नी व मुलं त्याच्या पत्नीच्या बहिणीच्या (मेव्हणी) च्या घरी लक्ष्मी यात्रेसाठी आले होते. परंतु काल मंगळवारी रात्री आपल्या पत्नीला व नातेवाईकांना आपल्या बलोगा गावाकडे जाऊन येतो असे सांगून गेला होता. परंतु तो घरी पोहोचलाच नाही. सकाळ झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
काल मंगळवारी रात्री कोणीतरी अज्ञात आरोपींनी शिवनगौडा ईरनगौडा पाटील याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्याच्या डोक्यावर व डाव्या बाजूच्या कानावर दगडाने ठेचून आल्याचे दिसून आले आहे. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहावर खानापूर येथील सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
याबाबत खानापूर पोलीस स्थानकाचे पीआय एल एच गवंडी व पीएसआय एमबी बिरादार पुढील तपास करीत आहेत