बेळगाव लाईव्ह : बेळगाव: धामणे गावात शुल्लक कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे परिणामी मोठ्या भावाने लहान भावाच्या खुनात झाले असून बुधवारी सकाळी ११ वाजता ही धक्कादायक घटना घडली.
लक्ष्मण भरमा बाळेकुंद्री (वय २८) हे खून झालेल्या लहान भावाचे नाव आहे, तर मारुती भरमा बाळेकुंद्री (वय ३०) हा आरोपी आहे. दोन्ही भावंडे बसवान गल्ली, धामणे येथे रहात होते बुधवारी दुपारी क्षुल्लक कारणावरून दोन्ही भावंडांमध्ये वाद निर्माण झाला. यादरम्यान लहान भावाला मोठ्या भावाने लोखंडी सळईने मारहाण करून ढकलून दिले. यावेळी लक्ष्मण बाळेकुंद्री हा तरुण घरातील कट्ट्यावर जाऊन आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच कोसळला व त्याचा मृत्यू झाला.
यापूर्वीही दोन्ही भावंडांमध्ये सातत्याने असे वाद व्हायचे. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले असून आई दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. अशा परिस्थितीत व्यसनाधीन भावंडांकडून झालेल्या वादावादीत एकाच मृत्यू झाल्याने डोळ्याने अंध असलेल्या आईसमोर अंधार पसरला आहे.
यापूर्वी देखील दोन्ही भावांमध्ये व्यसनाधीनतेमुळे वाद झाले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या भांडणांची शक्यता होतीच. दोन्ही भावांचा संपर्क आणि वाद कायम असायचे, यामुळे शेजारी राहणाऱ्यांनाही हि बाब नवी नव्हती. परंतु आज घडलेल्या या घटनेने अत्यंत क्रूरपणाचे रूप घेत अखेर या वादाचे पर्यवसान एकाच्या जीवावर बेतले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि आरोपी मारुती याला अटक केली आहे.