बेळगाव लाईव्ह : बेळगावात महागड्या मोबाईल खरेदीवरून वडिलांनी विचारणा केल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
वडिलांनी मोठ्या खर्चाबाबत केलेल्या प्रश्नांमुळे मानसिक तणावात गेलेल्या या युवकाने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबीय आणि समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना वैभवनगर परिसरात घडली असून २४ वर्षीय रशीद शेख या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच ७०,००० रुपये किमतीचा स्मार्टफोन खरेदी केला होता. मोठ्या खर्चाबाबत वडिलांनी विचारणा केली असता “इतका महागडा फोन घेण्याची गरज काय?” असा प्रश्न विचारला. या मुद्द्यावरून वडिलांसोबत वाद झाल्यानंतर त्याने गळफास घेऊन जीवन संपवले.
रमजान ईदचा सण नुकताच पार पडला असताना घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण आर्थिक दबाव होता की इतर काही तणाव, याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेने पालक आणि तरुणांमध्ये संवादाचा अभाव कसा टोकाच्या निर्णयाला कारण ठरू शकतो, यावर गंभीर विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. युवकांनी मानसिक आरोग्याचा विचार करून कोणताही टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी जवळच्या लोकांशी मोकळेपणाने बोलावे, असा सल्लाही तज्ज्ञांकडून दिला जात आहे.