बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या कचरा गाड्यांकडून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुडशेड रोड या रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकून मिनी कचरा डेपो निर्माण केला जात आहे. सार्वजनीक आरोग्याला धोका निर्माण करणारा सदर प्रकार तात्काळ थांबवावा, अन्यथा महापालिकेवर धडक मोर्चा काढू, असा इशारा परिसरातील संतप्त रहिवाशांनी दिला आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकाजवळील गुडशेड रोड या वाढत्या रहदारीच्या रस्त्याशेजारी अलीकडे महापालिकेच्या स्वच्छता गाड्यांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. शहरातून गोळा केलेल्या कचऱ्याचे मोठे ढिगारे साचून पडलेले असल्यामुळे या रस्त्याच्या कांही भागाला मिनी कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झालेले असते. मिळालेल्या माहितीनुसार ही जागा महापालिकेच्या स्वच्छता कंत्राटदाराने शहरातून गोळा केलेल्या कचऱ्यातून ओला व सुका कचरा वेगवेगळ्या करून तो तुरमुरी कचरा डेपोकडे नेण्यासाठी निवडली आहे.
ओल्या व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण नागरी वसाहती पासून दूर करण्याऐवजी गुड शेड रोड येथे संबंधित ठिकाणी केले जात असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचे वातावरण पसरलेले असते. याखेरीस साचून पडलेल्या कचऱ्यामुळे सदर रस्त्याचा परिसर आणि नजीकच्या शास्त्रीनगर भागात कायम दुर्गंधीचे वातावरण पसरलेले असते. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागते.
आसपास मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत असलेल्या ठिकाणी या पद्धतीने गलिच्छ कचऱ्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जात असल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच संबंधित प्रकाराला अधिकाऱ्यांची तर फूस नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या कचरा गाड्यांकडून गुडशेड रोड येथे कचरा टाकणे तात्काळ बंद न झाल्यास महापालिकेवर धडक मोर्चा काढण्याचा विचार त्यांनी चालवला आहे.

दरम्यान सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी आज महापालिकेच्या कचरा गाड्यातून गुडशेड रोड येथे कचरा टाकण्यास तीव्र आक्षेप घेतला. तसेच तेथे उपस्थित महापालिका कंत्राटदार व कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत तेथून काढता पाय घेतला. याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना गणेश दड्डीकर यांनी सांगितले की, पूर्वी या ठिकाणी कचरा टाकला जात असल्यामुळे महापालिकेतर्फे येथे फलक उभारून कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आली होती.
त्यामुळे स्थानिक लोकांनी या ठिकाणी कचरा टाकणे बंद केले होते. तथापी अलीकडे महापालिकेच्या कचरा गाड्याकडून शहरात गोळा केलेला कचरा या ठिकाणी आणून टाकला जात आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसात त्या कचरातून ओला व सुका कचरा वेगवेगळा करून तो कचरा डेपोला पाठवला जातो. मात्र हे सत्र सलग सुरू राहात असल्यामुळे आणि दोन-तीन दिवस साठून राहिलेल्या कचरामुळे या संपूर्ण परिसरात कायम प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते.
तुरमुरी डेपो सदृश्य येथील या मिनी कचरा डेपोच्या तीव्र दुर्गंधीमुळे गुडशेड रोड आणि शास्त्रीनगर येथील वातावरण दूषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. थेट कपलेश्वर उड्डाण पुलाला जाऊन मिळणाऱ्या या रस्त्यावर सततची रहदारी असते. त्याचप्रमाणे कचऱ्याचा ढीग व अस्वच्छतेमुळे येथून जवळच असलेल्या श्री मारुती मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्याच्या या कृतीबद्दल
अनेक वेळा महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही अशी माहिती देऊन येत्या चार दिवसात या ठिकाणी कचरा टाकणे थांबले नाही तर आम्ही या भागातील रहिवाशी महापालिकेवर धडक मोर्चा काढू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दड्डीकर यांनी दिला.