बेळगाव लाईव्ह :समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्या बाबतीत जे घडत आहे त्या संदर्भात वकिलांशी चर्चा करून कायदेशीर बाबी पूर्ण करण्याद्वारे कर्नाटक प्रशासनाविरुद्ध कायदेशीर लढा दिला जाईल. यासाठी वेळ पडल्यास उच्च न्यायालयाच्या वकिलांशी चर्चा करून शुभम शेळके यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना मुक्त करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली.
मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज बुधवारी दुपारी खानापूर रोडवरील मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीनंतर बेळगाव लाईव्हला माहिती देताना माजी आमदार मनोहर किणेकर यांनी आजच्या बैठकीमध्ये मुख्यत्वे करून हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक स्मृती भवनाच्या बांधकाम निधी संकलनासह समितीचे युवानेते शुभम शेळके यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर कर्नाटकचे पोलीस प्रशासन जो अन्याय करत आहे त्याबाबत विचारविनिमय करण्यात आल्याचे सांगितले.
हिंडलगा हुतात्मा स्मारक स्मृती भवन निधी संकलना संदर्भात बेळगाव शहर ग्रामीण आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती अशा तीन निधी संकलन समित्या नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे स्मृती भवनाचा हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प डिसेंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे केंद्र समजले जाणाऱ्या मराठा मंदिरचे चालक व्यवस्थापन मंडळ स्मृती भवनाचा एक मजला बांधून देईल अशी अपेक्षा आहे.
कारण मराठा मंदिरची इमारत उभी राहावी यासाठी तत्कालीन आमदार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने फार मोठं कार्य केले आहे. त्यामुळे मराठा मंदिरकडून त्याची परतफेड होईल अशी आशा बाळगून तसा ठराव आजच्या बैठकीत संमत करण्यात आला. येत्या काळात होणाऱ्या मराठा मंदिरच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही तशी विनंती देखील करणार आहोत.
याखेरीज समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्या बाबतीत जे घडत आहे त्या संदर्भात वकिलांशी चर्चा करून कायदेशीर बाबी पूर्ण करण्याद्वारे कर्नाटक प्रशासनाविरुद्ध कायदेशीर लढा दिला जाणार आहे. कारण याबाबतीत रस्त्यावर कितीही मोठा लढा उभारला तरी निर्लज्ज कर्नाटक सरकार त्याची दखल घेत नाही हा पूर्वानुभव आहे.
सार्वजनिकांच्या लढाईची दखल घेण्याऐवजी हे सरकार कार्यकर्त्यांवर तुम्ही दाखल करून निष्कारण त्रास देत आहे आणि म्हणूनच शुभम शेळके यांच्या बाबतीत कायदेशीर लढाई देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यांच्या नोटीसी वरील सुनावणीची तारीख 7 एप्रिल ही पडली आहे. त्यावेळी काय घडते हे पाहून पुढील पावले उचलली जातील. वेळ पडल्यास उच्च न्यायालयाच्या वकिलांशी चर्चा करून शुभम शेळके यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना मुक्त करण्याचे आजच्या बैठकीत ठरले आहे असे स्पष्ट करून त्याचप्रमाणे समितीच्या कार्यकर्त्यांना जर कोणता कार्यक्रम घ्यावयाचा असेल तर त्याने प्रथम त्याची माहिती देऊन कार्यक्रम घ्यावा असे आवाहनही आजच्या बैठकीत करण्यात आले असल्याचे शेवटी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले.
याप्रसंगी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण -पाटील, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.