बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर येथील मराठी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर समारंभासाठी बेळगावमध्ये आलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषी आणि संरक्षण मंत्री शरद पवार यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
यावेळी सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या भावना व्यक्त केल्या. दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच अनेक खासदारांची भेट घेऊन मराठी भाषिकांच्या प्रश्नसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने एक निवेदनही दिले होते.
या निवेदनात प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दावा लवकरात लवकर सुनावणीस यावा आणि साक्षी पुरावे सादर करून प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी विनंती करण्यात आली होती. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समिती व तज्ञ समिती यांची पुनर्रचना करून लवकरात लवकर बैठक घ्यावी. दाव्या संदर्भात वकिलांची नेमणूक, समन्वयकांची नेमणूक, सीमा कक्षातील कर्मचाऱ्यांची नेमणूक याबाबत लवकर निर्णय व्हावे, महाराष्ट्राचे सेवानिवृत्त महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची वकिलांच्या पॅनलवर नियुक्ती व्हावी. राज्य पुनर्रचना या विषयावर अविनाश कोल्हे यांची नेमणूक व्हावी, सिमसमन्वयक मंत्रीपदी नेमणूक करण्यात आलेल्या मंत्र्यांनी सीमाभागात भेट देऊन येथील आढावा घ्यावा, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

समिती शिष्टमंडळाच्या मागण्या ऐकून शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, लवकरात लवकर बैठक बोलाविण्याची विनंती करू अशी ग्वाही दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील तीन मंत्र्यांची नेमणूक केली आहे. मात्र आजतागायत या मंत्र्यांची बैठक झालेली नाही. यासाठी आपण स्वतः पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी अशी विनंती ही यावेळी करण्यात आली.
या शिष्टमंडळात म. ए. समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका म. ए. समितीचे एम. जी. पाटील, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, उपाध्यक्ष गोपाळराव पाटील व महादेव मंगनाकर यांचा समावेश होता