बेळगाव लाईव्ह : लहानपण आणि लहानपणाच्या आठवणी प्रत्येक माणसाला कायमस्वरूपी आठवणीत असतात म्हणूनच प्रत्येक जण जीवनात लहानपणी केलेल्या गोष्टी हृदयाच्या एका कप्प्यात साठवून ठेवत असतो. अशाच आठवणींना उजाळा देण्याचे काम येळळूर मॉडेल शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी केले आहे. शनिवार आणि रविवार दोन दिवस मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त अनेक माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत त्यांनी आपल्या भावना मानले आहेत.
आम्हाला घडवणाऱ्या सरकारी मराठी मॉडेल शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळा ही आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय गोष्ट असून आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे, असे उद्गार येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी काढले.
स्वातंत्र्यपूर्व काळात 1874 मध्ये स्थापन झालेल्या येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला आज शनिवारपासून अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर सदर शाळेचे माजी विद्यार्थी बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करत होते. येळ्ळूर येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील 1874 मध्ये स्थापन झालेल्या सरकारी मराठी मॉडेल शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आम्ही शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने हाती घेतला आहे. आमच्या शाळेच्या स्थापनेला 150 वर्षे पूर्ण होत असून या संपूर्ण वाटचालीचा आढावा घ्यावा. त्याचप्रमाणे या निमित्ताने येळ्ळूर गावातील नव्या पिढीसमोर शाळेचा इतिहास मांडता यावा. या उद्देशाने आम्ही हा शतकोत्तर महोत्सव हाती घेतला आहे. आतापर्यंत या शाळेने असंख्य विद्यार्थ्यांना घडवले आहे. त्यापैकी बरेच जण देश-विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत.

कर्नाटकसह महाराष्ट्र व गोवा राज्यातून तसेच विदेशातून शाळेचे माजी विद्यार्थी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवासाठी दाखल झाले आहेत. याचा आम्हाला आनंद होत असून शाळेच्या विकासासाठी आम्ही माजी विद्यार्थी विविध उपक्रम हाती घेणार आहोत. त्यामध्ये शाळेसाठी सुसज्ज मैदान, वाचनालय, प्रयोगशाळा, एज्युकेशन सारख्या अत्याधुनिक शिक्षणाची व्यवस्था वगैरे यांचा समावेश असणार आहे. हा उद्देश सफल करण्यासाठीच या महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आहोत. यासाठी लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांचे आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत असून आमच्या शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव हा खरोखर येळ्ळूर गावाच्या इतिहासात एक ऐतिहासिक क्षण आहे.
येळ्ळूरच्या सरकारी मराठी मॉडेल शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळा ही आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय गोष्ट असून आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे. आज वयाची पन्नाशी ओलांडलेल्या आम्हा सर्वांसाठी आमच्या शाळेचा हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणजे जणू सुवर्ण योगच आहे, असे शाळेच्या ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांनी सांगितले.
सरकारी मराठी मॉडेल शाळेतील 1988 -89 सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना येळ्ळूरच्या या शाळेने आम्हाला भरपूर कांही दिले आहे. या शाळेच्या बहुतांश माजी विद्यार्थ्यांनी भारतीय संरक्षण दलात सेवा बजावून देश सेवा केली असून कांही जण देश-विदेशातही गेले आहेत असे सांगून आमच्या बॅचकडून आम्ही शाळेला 70 हजार रुपये किमतीची साऊंड सिस्टिम सुविधा भेटी दाखल देत आहोत असे सांगितले.
-माजी विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परगावाहून देखील दाखल झालेले आहेत. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस झालेल्या या कार्यक्रमात जमलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा तर दिलाच याशिवाय आपल्या हृदयाच्या कप्प्यातील साठवून ठेवलेल्या आठवणी जागवल्या.