बेळगाव लाईव्ह : शेकडो वर्षांपासूनची परंपरा असलेल्या बेळगावमधील माळमारुती येथील श्री मारुती देवस्थानात हनुमान जयंती भक्तिभावात साजरी करण्यात आली.
बेळगावमधील अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री माळ मारुती देवस्थानात हनुमान जयंती भक्तीभावाने साजरी करण्यात आली. माळावर, लोकवस्ती नसलेल्या भागात हे मंदिर असल्याने या मंदिराला ‘माळमारुती’ असे नाव पडले, ते आजवर प्रचलित आहे. शेकडो वर्षांपूर्वी आजच्या माळ मारुती भागात लोक वस्ती नव्हती त्या काळापासून येथे मंदिर आहे म्हणून याचं नाव माळ मारुती म्हणजेच माळावरचा मारुती असे पडले आहे.
हनुमान जयंतीच्या औचित्याने शुक्रवारी रात्री पासूनच मंदिरात भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सकाळी ६. १९ मिनिटांनी श्री हनुमान जन्मोत्सव भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर अभिषेक, महापूजा, महाआरती करून नैवेद्य दाखवण्यात आला.
सकाळी जन्मोत्सव झाल्यावर उपस्थित भक्तांना मंदिरातर्फे न्याहारी देण्यात आली. सकाळ पासून भक्तांनी संकट मोचक हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.हनुमान जयंती निमित्त संपूर्ण मंदिराची फुलाने सजावट करण्यात आली होती.
संपूर्ण दिवसभर भक्तांना तीर्थ प्रसादाचे वितरण करण्यात आले. दुपारी बारा वाजता महाप्रसाद वितरणाला प्रारंभ करण्यात आला. दुपारी तीन वाजेपर्यंत हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अशी माहिती मंदिराच्या विश्वस्त अंजली दशरथ पुजारी यांनी दिली.