बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील सुप्रसिद्ध उद्योजक दाम्पत्य, लिओ इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप बिर्जे आणि व्यवस्थापकीय भागीदार सोनाली जयदीप बिर्जे यांनी संयुक्तरित्या जर्मनीमध्ये आयोजित ‘इंडो-जर्मन व्यवसाय सहयोग’ हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
सदर कार्यक्रम डियुसची जीसेल्सचाफ्ट फर इंटरनॅशनल झूसेमिनारबीट (जीआयझेड) जीएमबीएच आणि आयएमएपी यांनी एफआयसीसीआयच्या सहकार्याने आयोजित केला होता.
जर्मनीमध्ये गेल्या फेब्रुवारी ते एप्रिल 2025 दरम्यान पार पडलेल्या 21 दिवसांच्या या कार्यक्रम वजा अभ्यासदौऱ्यात लिओ इंजिनियर्स बेळगावचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप बिर्जे आणि व्यवस्थापकीय भागीदार सोनाली बिर्जे या दाम्पत्याने आंतरराष्ट्रीय व्यवसाय तत्त्वे, उद्योजकीय कौशल्ये, आणि विविध जर्मन कंपन्यांशी संवाद साधण्याचा अमूल्य अनुभव घेतला.
टिळकवाडी, बेळगाव येथील ठळकवाडी हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेले जयदीप बिर्जे आणि त्यांची पत्नी सोनाली यांना या यशामध्ये पालक गोपाळराव बिर्जे आणि वर्षा बिर्जे यांच्यासह सासरे दत्तात्रय कदम व सासूबाई श्रीमती शीतल कदम यांचे मोलाचे पाठबळ लाभले.
त्यांची मुले श्रीषा आणि श्रीयान यांनी देखील आईवडीलांच्या अनुपस्थितीत व्यवस्थित राहून त्यांना समजूतदारपणे साथ दिली. त्यामुळेच आपला हा आंतरराष्ट्रीय दौरा यशस्वी झाल्याचे बिर्जे दाम्पत्य सांगतात.
इंडो-जर्मन व्यवसाय सहयोग आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ डसेलडॉर्फ, जर्मनी येथील आयएमपीपी सेंटर येथे पार पडला. यावेळी प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर बोलताना बिर्जे दाम्पत्याने “ही संधी आमच्यासाठी केवळ व्यावसायिक नव्हे, तर वैयक्तिकदृष्ट्याही समृद्ध करणारी ठरली. आम्ही एकत्र शिकत एकत्र वाढलो असून परिवाराच्या आधाराशिवाय आजचे हे यश शक्य झाले नसते,” असे सांगितले.
इंडो-जर्मन व्यवसाय सहयोग प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश भारत आणि जर्मनीमधील द्विपक्षीय व्यापारसंबंध अधिक दृढ करणे आणि नव्या व्यावसायिक संधींना चालना देणे होता. हा कार्यक्रम आर्थिक व्यवहार आणि हवामान कृती संघीय मंत्रालयाच्या (फेडरल मिनिस्टरी फॉर इकॉनोमिक अफेयर्स अँड क्लायमेट ॲक्शन) पुढाकाराने राबवण्यात आला. या कार्यक्रमाच्या अनुभवाच्या आधारावर उद्योजक जयदीप आणि सोनाली बिर्जे हे आता भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायिक संधींचा शोध घेण्यास सज्ज झाले आहेत.