बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथे १३ वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी न्यायालयाने कठोर निर्णय घेतला आहे. आरोपी शाहू राम गवडे याला २० वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, पीडित बालिकेला ४ लाख रुपयांचे नुकसानभरपाई मंजूर करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय बालिका आपल्या आजीसोबत राहत होती. मात्र, ती व्यवस्थित बोलू शकत नव्हती. १६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आरोपी शाहू राम गवडे (वय ४०, रा. खानापूर, जि. बेळगाव) याने पीडितेच्या घरी जाऊन, तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
या घटनेनंतर खानापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ नायक यांनी त्वरित गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. १ डिसेंबर २०२३ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपीस ४ ऑक्टोबर २०२३ रोजी अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासाचे सहाय्यक म्हणून मंजुनाथ मुरळी यांनी कर्तव्य बजावले.
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ४ एप्रिल २०२४ रोजी माननीय विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीस दोषी ठरवून २० वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
तसेच, पीडित बालिकेसाठी ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता एल. व्ही. पाटील यांनी युक्तिवाद सादर केला.