कळसा -भांडुरा प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवा -जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0
6
Mhadai
 belgaum

बेळगाव लाईव्ह :म्हादाई नदी वळणाच्या (ड्रायव्हर्जन ) कळसा -भांडुरा प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या नियुक्त पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात जंगलतोड आणि विखंडन करून अपरिवर्तनीय नुकसान होणार आहे.

तसेच म्हादाई -मलप्रभा पाणलोट क्षेत्रात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन प्रदेशातील लोकांच्या उपजीविकेवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. या खेरीज अन्य इतर गंभीर कारणास्तव कळसा -भांडुरा प्रकल्प सरकारने तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींसह खानापूर तालुक्यातील शेतकरी व जनतेने केली असून तशा आशयाचे निवेदन आज शुक्रवारी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

पर्यावरणप्रेमी शिवाजी कागणीकर, सुजित मुळगुंद, दिलीप कामत नागेंद्र प्रभू, शिवलीला मिसाळे आदींच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी रोशन यांनी करण्यात आलेली मागणी सरकार दरबारी मांडून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.

 belgaum

निवेदनात खानापूर तालुक्याचा संपूर्ण पश्चिम घाट हा संवेदनशील भागाच्या प्रथम श्रेणीत मोडतो. यासाठी या ठिकाणी निसर्गाला हानी पोहोचविल्यास स्थानिक सूक्ष्म हवामान पर्यावरण पर्जन्यमान यावर दूरगामी प्रतिकूल आणि विनाशकारी परिणाम होणार आहेत.

कळसा आणि भांडुरा प्रकल्प राबविल्यास 700 चौरस कि.मी. भीमगड आणि म्हादाई अभयारण्याला धोका पोहोचणार आहे. या प्रदेशातील जल सुरक्षेचा प्रश्न आणखी बिकट होणार आहे. याव्यतिरिक्त शेती व उपजीविकेवर, तसेच संपूर्ण खानापूर तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होणार आहे.

या सर्व आणि त्याहून अधिक कारणांमुळे नेरसा येथे प्रकल्पाचे हाती घेण्यात आलेले काम, तसेच प्रकल्पासाठी लागणारे पाईप आणि इतर साहित्य निर्मितीचे सुरू झालेले काम, हे सर्व तातडीने थांबविण्यात यावे. कळसा -भांडुरा प्रकल्पाच्या अनुषंगाने असोगा, नेरसा, मनतुर्गा, रुमेवाडी, करंबळ या गावांमधील शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी देण्यात आलेल्या नोटीसी मागे घेण्यात याव्यात.Mhadai

एकंदर कळसा -भांडुरा प्रकल्पाच्या होणाऱ्या गंभीर परिणामांचा विचार करून हा प्रकल्प त्वरित रद्द करण्यात यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात आहे. निवेदन सादर करतेवेळी सतीश पाटील, ॲड. नीता पोतदार, नायला कोयला, दीपक जमखंडी, गीता साहू, शारदा गोपाळ, आसिफ मुल्ला आदींसह पर्यावरण प्रेमी व खानापूर तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

नेरसा (ता. खानापूर) येथील भांडुरा नाला वळवून भूमिगत पाईपलाईनद्वारे म्हादाई नदीचे पाणी नवलतीर्थला नेण्यात येणार आहे. भूमिगत पाईपलाईन घालण्यासाठी शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाची नोटीस देण्यात आली आहे.

या विरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. पर्यावरणप्रेमी आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक गेल्या बुधवारी खानापूर येथे पार पडली. या बैठकीत प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय घेऊन तहसीलदार उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले होते त्यानुसार आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.