बेळगाव लाईव्ह : बेळगावात आज भाजपने काँग्रेस सरकारविरुद्ध जनआक्रोश यात्रा काढली. या यात्रेद्वारे भाजप नेत्यांनी काँग्रेस सरकारवर तीव्र आरोप केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी काँग्रेसला भ्रष्टाचाराचे जनक आणि देशाच्या संसाधनांची लूट करणारे पक्ष म्हणून संबोधले.
विजयेंद्र यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करताना, काँग्रेसने आपल्या सत्तेचा गैरवापर करून यंग इंडिया ट्रस्ट च्या माध्यमातून संपत्ती जमवली आहे. मोदी सरकारच्या पारदर्शक तपास धोरणामुळे या ट्रस्टमधील भ्रष्टाचार उघडकीस आला असून, काँग्रेसच्या विकासाची हीच एक उदाहरण आहे, असे विजयेंद्र यांनी म्हटले.
काँग्रेसला भ्रष्टाचारासाठी जन्मलेला पक्ष मानत विजयेंद्र यांनी नॅशनल हेराल्ड घोटाळ्याचे उदाहरण दाखल्यादाखल दिले. त्यांनी काँग्रेसच्या ६० वर्षांच्या सत्तेचा उल्लेख करत सांगितले की, या कालावधीत काँग्रेसने अनेक भ्रष्ट कारवायांमध्ये भाग घेतला आहे. काँग्रेसने कधीच देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले नाही, उलट त्या पक्षाने केवळ आपल्या हितसंबंधांवर लक्ष केंद्रित केले आहे.
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. सिद्धरामय्या आपल्या खुर्चीचे रक्षण करण्यासाठी राज्याचे लूट करत आहेत. आर. अशोक यांनी सांगितले की, डी. के. शिवकुमार यांच्या भ्रष्ट कारवायांकडे कोणीही लक्ष देत नाही. अशोक यांनी यावेळी काँग्रेसचा इशारा दिला की, आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार नाही.
माजी मंत्री श्रीरामुलू, खासदार यदुवीर वोडेयार यांनीही काँग्रेसवर ताशेरे ओढत राज्याच्या विकासावर काँग्रेस सरकारच्या चुकीच्या धोरणांचा प्रभाव पडल्याचे सांगत राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. आगामी २०२८ साली होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा भाजपाची सत्ता प्रस्थापित करण्याचा ठाम विश्वास यावेळी भाजप नेत्यांनी व्यक्त केला. या आंदोलनात भाजपचे आजी – माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.