बेळगाव लाईव्ह :सरस्वतीनगर, गणेशपुर येथे गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या घरफोडीचा छडा लावताना कॅम्प पोलिसांनी दोघा आंतरराज्य चोरट्यांना गजाआड केले असून त्यांच्याकडील 11 लाख 83 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे वखारअहमद अन्वर शेख आणि शुभम भगवानसिंग मुभाला (दोघे रा. मध्य प्रदेश) अशी आहेत.
याबाबतची माहिती अशी की, सरस्वतीनगर गणेशपूर येथील अँथोनी डिक्रुझ हे आपल्या पत्नी समवेत गेल्या 16 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास राजस्थान येथील आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील 17 लाख 28 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख 40 हजार रुपये लंपास केल्याची घटना दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन चोरीचा छडा लावण्यासाठी तपास कार्य हाती घेण्यात आले होते.
शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) रोहन जगदीश, पोलीस उपायुक्त (गुन्हे व रहदारी) निरंजनराज अरस, खडेबाजार विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अल्ताफ एम. यांच्या नेतृत्वाखाली उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण होनकट्टी,
सीएचसी बसवराज उज्जैनकोप्प, सीपीसी जे. एस. लमानी, एन. एम. तेली, एच. वाय. विभूती, संतोष बी. बरगी, एम. एस. लमानी आणि आर. एस. अक्की या पथकाने नुकताच उपरोक्त घरफोडीचा छडा लावला. या पोलीस पथकाने मध्यप्रदेशातील वखार अहमद अन्वर शेख आणि शुभम भगवानसिंग मुभाला या दोघांना गजाआड करून त्यांच्या जवळील 11 लाख 83 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.




