बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये संविधान बचाव आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी भर सभेत मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून गोंधळ घातला.
दरम्यान या महिला कार्यकर्त्यांना भर सभेत येण्याची परवानगी कुणी दिली? या महिला कार्यकर्त्या सभेत आल्याच कशा? या घडामोडी घडत असताना पोलीस काय करत होते असा सवाल उपस्थित करत महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पोलिसांना धारेवर धरले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या भाषणासाठी उभे राहताच ‘गो बॅक पाकिस्तान’ अशा घोषणा देत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी वातावरण तापवले. हा सारा प्रकार घडत असताना पोलिसांचा ढिसाळपणा यासाठी जबाबदार ठरल्याचा ठपका ठेवत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांनी पोलिसांना फैलावर घेतले.
कडेकोट पोलीस यंत्रणा तैनात असताना असे प्रकार घडतातच कसे? असा सवाल उपस्थित करत भर सभेत मंत्री हेब्बाळकर पोलीस यंत्रणेवर भडकल्या.


सभेदरम्यान गोंधळ घालणाऱ्या पाच महिला कार्यकर्त्यांना कॅम्प पोलीस स्थानकात हजर करण्यात आले असून याठिकाणीही भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. यासंदर्भात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, आमच्याकडेही शक्ती आहे.
आम्ही रस्त्यावर उतरलो तर भाजपचे कार्यक्रम थांबवू शकतो, भाजप कार्यकर्ते शांततेत सुरु असलेल्या कार्यक्रमात अडथळा आणत आहेत. ही भाजपच्या नैराश्याची लक्षणे आहेत. जर आम्हीही आमची शक्ती वापरली तर भाजपचे गावोगावी होणारे कार्यक्रम रोखू शकतो, असे हेब्बाळकर म्हणाल्या.