बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील जी.एस.एस. महाविद्यालयाच्या विज्ञान क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत ‘आर. के. देसाई सायन्स इनोव्हेशन हब’ या नावाने नव्या विज्ञान प्रयोग व संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सर्जनशील विचारांना चालना देणारे आधुनिक आणि प्रयोगशील व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
बेळगावमधील जी.एस.एस. महाविद्यालयाच्या परिसरात नुकतेच ‘आर. के. देसाई सायन्स इनोव्हेशन हब’ या विज्ञान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. दक्षिण कोकण एज्युकेशन सोसायटीचे अशोक शानभाग यांच्या हस्ते हे उद्घाटन शनिवारी पार पडले.

या विज्ञान केंद्राच्या स्थापनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक नवकल्पना मांडण्यास आणि प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे शिक्षणाची व्याप्ती वाढवण्यास मदत होणार आहे. सैद्धांतिक शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष संशोधन व प्रयोगाला प्राधान्य देणारे हे केंद्र सर्जनशील शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
‘आर. के. देसाई सायन्स इनोव्हेशन हब’ हे केंद्र प्रसिद्ध उद्योजक व चार्टर्ड अकाउंटंट स्वर्गीय आर. के. देसाई यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आले आहे. देसाई कुटुंबीयांनी या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य करून त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न साकारले आहे.
कार्यक्रमाला जी.एस.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी तसेच देसाई कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विज्ञान शिक्षण क्षेत्रात अशा प्रयोगशील केंद्राची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
याचा लाभ शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, बेळगाव परिसरातील शाळा – महाविद्यालये, पालकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून हे केंद्र भविष्यात संशोधन, विज्ञान विषयक कार्यशाळा, प्रकल्प, व नवनवीन कल्पनांची अंमलबजावणी यासाठी एक सशक्त व्यासपीठ ठरेल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.