बेळगाव लाईव्ह:बैलहोंगल (जि. बेळगाव) तालुक्यातील बेळवडी गावामधील आश्रय योजनेसाठी राखीव ठेवलेली जमीन संगणमताने हडप करून सरकारचे सुमारे 10 कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी उत्तर कर्नाटक होराट समितीचे अध्यक्ष व मुडलगीचे माहिती हक्क कार्यकर्ता भीमाप्पा गडाद यांनी केली आहे.
शहरामध्ये आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी गावात असलेल्या सर्व्हे नं. 221/1ब मधील 6 एकर जमीन आश्रय योजनेसाठी राज्यपालांच्या नावे सरकारने खरेदी केली होती.
गेल्या 14 मार्च 2002 रोजी हा खरेदी व्यवहार झाला होता. मात्र त्यानंतरच्या 20 वर्षात जिल्हाधिकारी, सर्वेक्षण खात्यातील अधिकारी, बैलहोंगल तहसीलदार वगैरे संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी जमीन मालकाला हाताशी धरून संगणमताने राज्यपालांच्या नावे असलेल्या त्या 6 एकर जमिनीपैकी फक्त 37 गुंठे जमीन सुरक्षित ठेवून उर्वरित जमिनीची परस्पर हडप करून राज्यपालांना 5 एकर 3 गुंठ्यांना टोपी घातली आहे.
या पद्धतीने सरकारचे सुमारे 10 कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे, अशी माहिती देऊन तेंव्हा सरकारने संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल करून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी माहिती हक्क कार्यकर्ता भीमाप्पा गडाद यांनी शेवटी केली.