बेळगाव लाईव्ह : टिळकवाडी परिसरातील पहिल्या रेल्वे गेटजवळ लावण्यात आलेली बॅरिकेड्स प्रायोगिक तत्वावर काही काळासाठी हटवण्यात आली होती. मात्र या काळात झालेला वाहतूक गोंधळ, पावसामुळे वाढलेली कोंडी पाहता पोलिसांनी पुन्हा बॅरिकेड्स बसवले आहेत.
बेळगाव शहरातील टिळकवाडी फर्स्ट गेट परिसरात वाहतूक सुधारण्यासाठी काही दिवसांपूर्वी बॅरिकेड्स हटवण्यात आले होते. नागरिकांच्या मागणीनुसार हा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला होता. परंतु, या काळात झालेला अवकाळी पाऊस, त्यानंतर निर्माण झालेल्या समस्यां आणि संध्याकाळच्या वेळेस जाणाऱ्या रेल्वे यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी यावरून पुन्हा एकदा बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. विशेषतः संध्याकाळी ६.३० च्या सुमारास दोन रेल्वे गाड्या गेल्यामुळे आणि पावसामुळे रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. बॅरिकेड्स नसल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि परिसरात गोंधळ उडाला.
सामान्य नागरिकांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देत, पोलिसांच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे तर काहींनी संतापही व्यक्त केला आहे. विदेशात गेले की हेच लोक नियम काटेकोरपणे पाळतात, मग इथेच का विसरतात? असा सवाल करत अनेकांनी बॅरिकेड्सची गरज पटवून दिली.
तर काहींनी रहदारी विभागाच्या अपयशाबद्दल प्रतिक्रिया दिल्या. तर काहींनी जरी सध्या वाहतुकीच्या सुरळीत प्रवाहासाठी बॅरिकेड्स पुन्हा लावण्यात आले असले तरी, काही काळासाठी तीनही गेट निर्बंधांशिवाय सुरू होते, आणि त्यावेळीही वाहतूक काही प्रमाणात व्यवस्थित होती, हे स्थानिक नागरिक विसरलेले नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पोलिसांनी आता पुन्हा एकदा बॅरिकेड्स लावून वाहतूक सुरक्षित ठेवण्याचं काम सुरू केलं आहे. सुरक्षित वाहतूकसाठी योग्य पाऊल, अशाही प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत असून काहीजण या निर्णयाचे स्वागत करत आहेत तर काहीजण उपरोधिक टीकाही व्यक्त करत आहेत.