बेळगाव लाईव्ह :सरकारने शेतकऱ्यांच्या कोबी उत्पादनाला योग्य हमीभाव द्यावा. तसेच सध्याच्या घसरलेल्या दरामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई त्यांना द्यावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरु सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
सध्या कोबीला मातीमोल किंमत मिळत असल्यामुळे शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात छेडण्यात आले. तसेच या आंदोलनाप्रसंगी रस्त्यावर कोबी फेकून शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने करून नुकसान भरपाईची मागणी केली.
यासंदर्भात त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आप्पासाहेब देसाई यांनी कोबी पिकाला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या बिकट परिस्थितीची माहिती दिली. सदर माहिती ऐकून घेण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून शेतकऱ्यांना त्यांची मागणी सरकार दरबारी मांडण्यात येईल, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना कल्लेहोळ येथील कोबी उत्पादक शेतकरी शंकर तुकाराम वेताळ म्हणाले की, गेल्या 50 वर्षापासून मी कोबीचे पीक घेत आहे आम्ही शेतकरी काबाडकष्ट करून हे पीक घेत असतो, मात्र कोबी पिकाला योग्य हमीभाव देण्याकडे सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे.
सदर पीक घेण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांना प्रति एकर 30 ते 40 हजार रुपये खर्च येत असतो. हा खर्च लक्षात घेता सध्या होलसेल भाजी मार्केटमध्ये कोबीला प्रति पोते 50 रुपये दर दिला जात आहे. इतका अल्प दर मिळाला तर त्यामधून आम्ही मजुरी आणि कुटुंबच्या उदरनिर्वाहाचा खर्च कसा भागवायचा? अलीकडे कोबी पिकाला मातीमोल दर मिळत असल्यामुळे आम्ही शेतकरी देशोधडीला लागण्याच्या स्थितीत आहोत असे सांगून तरी सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन आम्हा शेतकऱ्यांच्या कोबी पिकाला योग्य दर द्यावा.
तसेच घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शंकर वेताळ यांनी केली.