बेळगाव लाईव्ह :सालाबादप्रमाणे परंपरेनुसार कोल्हापूर येथील श्री ज्योतिबा डोंगरावरील चैत्र पौर्णिमेची यात्रा आटोपून जोतिबाच्या नावानं चांगभलं, काळभैरवाच्या नावानं चांगभलं अशा जयघोषात चव्हाट गल्ली येथील श्री देवदादा सासनकाठी आज गुरुवारी पुनश्च बेळगावमध्ये दाखल झाली. त्यानिमित्त शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे शहरातील चव्हाट गल्ली येथील श्री देवदादा सासनकाठी गेल्या 3 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या यात्रेसाठी कोल्हापुरातील जोतिबा डोंगराच्या दिशेने रवाना झाली होती. आता पंधरा दिवसानंतर यात्रा आटोपून श्री देवदादा सासनकाठीचे पुन्हा बेळगावात आगमन झाले आहे.
आगमन होताच प्रथेनुसार चैत्र पौर्णिमेनिमित्त शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये देवाची पूजा करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिरा आवारामध्ये आज गुरुवारी दुपारी आयोजित या महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचा बेळगाव शहर परिसरात हजारो भक्तांनी लाभ घेतला. देवदर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांमुळे शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना चव्हाट गल्ली येथील हसबे गुरुजी यांनी सांगितले की, गेली 215 वर्षाची परंपरा असलेली श्री देवदादा सासनकाठी गेल्या 3 एप्रिल रोजी बेळगाव नगरीतून निघाली. त्यानंतर सासनकाठी समवेत आम्ही पंधरा दिवसांचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान आम्ही जोतिबाच्या डोंगरावर तळाच्या ठिकाणी पाच दिवस वास्तव्य केले.
त्या ठिकाणी पवळीमध्ये आमची पालखी नाचवली गेली. ही पालखी नाचवताना नंदीला उंट येऊन भेटतो, वगैरे सर्व परिक्रिया पूर्ण झाल्यानंतर दवणा करून आम्ही महाप्रसाद केला. या महाप्रसाद वाटपानंतर आम्ही पुन्हा बेळगावमध्ये आलो आहे. एकाच दिवशी 35 आणि 20 कि.मी. अंतराचे दोन पल्ले पार करावे लागत असल्यामुळे हा पायी चालत येण्याचा प्रवास खूप खडतर असतो.
जोतिबाच्या नावाने चांगभलं काळभैरवाच्या नावाने चांगभलं असा जयघोष करत निघणाऱ्या या श्री देव दादा सासनकाठीच्या पदयात्रेत बेळगावातील सुमारे शंभर-एक भक्तांचा सहभाग असतो. यंदाही तो होता आणि बेळगावात आगमन झाल्यानंतर या शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिराच्या ठिकाणी परंपरेनुसार पूजा करून आज महाप्रसादाचे वाटप केले जात आहे अशी माहिती, हसबे गुरुजी यांनी दिली.