बेळगाव लाईव्ह :कन्फिडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘क्रेडाई’च्या बेळगाव विभागाच्या 2025 -2027 या कालावधीसाठीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ उद्यमबाग येथील शगुन गार्डन येथे नुकताच उत्साहात पार पडला.
सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांच्यासह निमंत्रित पाहुणे म्हणून कर्नाटक शाखेचे अध्यक्ष प्रदीप रायकर, क्रेडाई कर्नाटकचे नियुक्त अध्यक्ष भास्कर नागेंद्रप्पा आदी उपस्थित होते. सदर समारंभात क्रेडाई बेळगावचे नूतन अध्यक्ष बनलेल्या युवराज हुलजी यांच्याकडे अधिकार पदाची सूत्रे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी हुलजी यांच्यासह नूतन कार्यकारणी मधील सचिव -प्रशांत वांडकर, खजिनदार -सुधीर पानारे, उपाध्यक्ष -आनंद कुलकर्णी, नियुक्त अध्यक्ष -गोपाळराव कुकडोळकर, मावळते अध्यक्ष -दीपक गोजगेकर, संयुक्त सचिव -सचिन कळ्ळीमनी, संचालक -सलीम शेख, राजेश माळी, सचिन बैलवाड, वीरेश शेट्टन्नावर, डी. ए. सायनेकर, शहर समन्वयक महिला विभाग करुणा हिरेमठ, सचिव सविता सायनेकर, निमंत्रक अभिषेक मुतगेकर आणि सहनिमंत्रक जयराज माळी या सर्वांना अधिकार पदाची शपथ देवविण्यात आली.

अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना युवराज हुलजी यांनी नैतिक व्यवसाय पद्धती, शाश्वत विकास आणि सरकारी यंत्रणे सोबत सशक्त भागीदारी या माध्यमातून आपण कार्य करत राहू. नवनवीन संकल्पना राबवण्यात पारदर्शकता व ग्राहकांचे समाधान यावर आमचा भर असेल, असे सांगितले.
त्यानंतर मावळते अध्यक्ष दीपक गोजगेकर यांनी नूतन अध्यक्ष हुलजी यांच्याकडे औपचारिक सूत्रे प्रदान केली. यावेळी मागील कार्यकाळात गोजगेकर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कार्याची प्रशंसा करण्यात आली. यावेळी रणजीत नाईकनवरे, प्रदीप रायकर व भास्कर नागेंद्रप्पा यांची नूतन कार्यकारणीला शुभेच्छा देणारी भाषणे झाली.
शगुन गार्डन येथे गेल्या बुधवारी झालेल्या अधिकार ग्रहण समारंभाने रिअल इस्टेट क्षेत्रात व्यावसायिकतेला प्रोत्साहन देण्याच्या क्रेडाईच्या ध्येयाला आणि भारतातील शहरी विकासाला आकार देण्याच्या भूमिकेला अधोरेखित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले.