बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या विशेष पोक्सो न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी ठोठावली आहे. पीडितेला ४ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे.
सदलगा पोलीस स्थानकात २०२२ साली दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, भैरमण्णा कल्लप्पा वाघी (वय २८, रा. अक्किवाट, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) याने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फसविले व अपहरण केले. त्यानंतर एका खासगी वाहनाने तिला अज्ञात स्थळी नेत लैंगिक अत्याचार केले. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली.
या प्रकरणी सदलगा पोलीस स्थानकात कलम ३६६(A), ३७६(२)(f), आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. सरकारी बाजूने विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी युक्तिवाद केला.
प्रकरणाची सुनावणी बेळगावच्या विशेष पोक्सो न्यायालयात न्यायमूर्ती सी. एम. पुष्पलता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. एकूण १२ साक्षी, ८८ कागदपत्रे आणि ४ महत्त्वाचे पुरावे यावरून आरोपी दोषी ठरला.
न्यायालयाने आरोपी भैरमण्णा वाघी याला २० वर्षांची सक्तमजुरी आणि १०,००० रुपयांचा दंड, तर पीडितेला ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.