बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कारगाड्यांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या अंतरराज्यीय टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तामिळनाडूचा असून, त्याच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
बेळगाव शहरात गाड्या निशाणा करून त्यातील मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीचे नाव दीनदयालन उर्फ दीन (वय 20) असून, तो तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील श्रीरंगम तालुक्यातील रहिवासी आहे.
बेळगाव शहरात या चोरट्याने गाड्यांच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप, आयपॅड आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या. पोलिसांनी विशेष पथक तयार करून तामिळनाडूत पाठवले होते.
तिथून आरोपीला अटक करून त्याच्याकडून 2 लाख रुपये किमतीचे 2 अॅपल लॅपटॉप, 1.5 लाख रुपये किमतीचे 2 आयपॅड आणि 50 हजार रुपये किमतीचे ऑटोस्कोप असे एकूण 4 लाख रुपये किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. या गुन्ह्यात आरोपीच्या वडिलांचा देखील सहभाग असून जयशिलन असे त्यांचे नाव आहे. ते सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बनयांग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपायुक्त रोहन जगदीश, उपायुक्त निरंजन राज अरस, सहाय्यक पोलिस आयुक्त संतोष सत्यनायक यांच्या देखरेखीखाली माळमारुती पोलिस ठाण्याच्या निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तपास करून आरोपीला पकडले.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक होन्नप्प तळवार, श्रीशैल हुलगेरी, उदय पाटील तसेच अन्य कर्मचारी आणि तांत्रिक विभागातील अधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिस आयुक्तांनी संपूर्ण पथकाच्या कार्याची प्रशंसा केली आहे.